कोरोनाने हिरावला मामाच्या गावचा आनंद !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:32+5:302021-05-25T04:43:32+5:30
तरडगाव: ‘झुक झुक झुक झुक आगीनगडी धुरांच्या रेघा हवेत काडी.. पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया....’ या सद्य:स्थितीत ...
तरडगाव: ‘झुक झुक झुक झुक आगीनगडी धुरांच्या रेघा हवेत काडी.. पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया....’ या सद्य:स्थितीत हे गीत म्हणजे एक विरोधाभास आहे. या मार्गात कोरोनारूपी मोठा राक्षस उभा असल्याने ही सफर सध्या होणं अशक्यच आहे. कोरोनाच्या भीतीने ठिकठिकाणच्या गाव सीमा बंद केल्याने भाच्यांची इच्छा असूनही मामाच्या गावाला जाणे कठीण झाले आहे.
परीक्षा संपल्यानंतर शाळेला सुट्टी लागल्यावर कधी एकदा मामाच्या गावाला जातोय, असे शालेय मुलांना वाटत असते. तिकडे गेल्यावर झाडांवर झोके घेणे, आंबे खाणे, पोहायला जाणे, बालमित्रांसोबत दंगामस्ती करीत विविध खेळ खेळणे यासारख्या अनेक बालवयातील हरकती मुलांकडून होत असतात. मात्र, गेल्या दोन उन्हाळी सुट्टया या कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाया गेल्याची खंत मुलांना बोचत आहे. आजोळी जाण्याचे त्यांचे स्वप्न भंगून हे दिवस पुन्हा येणार नाहीत, या कल्पनेने त्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. गेली दोन वर्षे नातलग व संवगड्यांची भेट न झाल्याने या बालमित्रांना चुकल्यासारखे होत आहे.
कोरोनामुळे नातेवाइकांची भेट दुरावली असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांची विचारपूस केली जात आहे. काही जवळच्या नात्यातील व्यक्तीचा कोरोनाने झालेला मृत्यू चटका लावून जात आहे. दरम्यान, नातेसंबंध दुरावले असले तरी काळजी घ्या, हे दोन आपुलकीचे दिलासा देणारे शब्द एकमेकांबद्दल तोंडातून निघत आहेत.
(चौकट)
खेळ बंद, मोबाईल हाती...
कोरोना संक्रमणाचा धोका मुलांनादेखील बसू लागल्याने त्यांचे बाहेरचे मैदानी खेळ बंद झाले आहेत. ऑनलाईन शिक्षण पद्धतीमुळे मोबाईलचा अतिवापर वाढला आहे. लिंकवरील स्वाध्याय सोडविण्याबरोबर इतर ऑनलाईन खेळ खेळण्यात ते मग्न असतात. एकंदर कोरोनामुळे मामाच्या गावाला जाता न आल्याने हिरमोड झाल्यासारखी स्थिती मुलांची झाली आहे.