वर्णे गाव ठरतोय कोरोना ‘हॉटस्पॉट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:38 AM2021-04-17T04:38:18+5:302021-04-17T04:38:18+5:30

नागठाणे : वर्णे (ता. सातारा) येथे घेण्यात आलेल्या अँटिजेन कोरोना चाचणी शिबिरात तब्बल एकवीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हे ...

Corona 'hotspot' | वर्णे गाव ठरतोय कोरोना ‘हॉटस्पॉट’

वर्णे गाव ठरतोय कोरोना ‘हॉटस्पॉट’

Next

नागठाणे : वर्णे (ता. सातारा) येथे घेण्यात आलेल्या अँटिजेन कोरोना चाचणी शिबिरात तब्बल एकवीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हे गाव कोरोनाचे ‘हॉटस्पॉट’ ठरले आहे. त्यामुळे नागठाणे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या शिबिरात एकूण १४० जणांची रॅपिड अँटिजेन तपासणी करण्यात आली. त्यात २१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, यापूर्वी मागील आठ ते दहा दिवसांपासून दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यातील दोघे कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असून, इतरांचे घरामध्येच अलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत एकूण ३२ ॲक्टिव्ह रुग्ण असल्याचे आरोग्य विभागातून समजते.

वर्णेत मागील शनिवारी होणारे लसीकरण शिबिर लसीच्या तुटवड्यामुळे स्थगित करण्यात आले होते. ज्यांना शक्य होते त्यांनी नांदगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून लस घेतली.

मागील दहा दिवसांपासून अशी परिस्थिती निर्माण झाल्याने व पुढे रुग्णांमध्ये वाढ होऊ नये म्हणून गावाने प्रशासनाच्या मदतीने पुढील दहा दिवसांसाठी स्वयंस्फूर्तीने कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे. नायब तहसीलदार सुनील मुनाळे, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, बोरगाव पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा डाळिंबकर, ग्राम दक्षता समिती, ग्रामपंचायत सदस्य व मोजक्या ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत दिनांक १६ ते २५ एप्रिल या दहा दिवसांत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. जी. पवार, आरोग्य विस्तार अधिकारी धर्माधिकारी, मंडल अधिकारी राजेंद्र लेंभे, डॉ. अनघा तारळेकर, सुधाकर बोधे, पोलीस कर्मचारी विजय देसाई, सरपंच विजय पवार, उपसरपंच कुसूम पवार, ग्रामसेवक सत्यवान वाघमारे, तलाठी कोळी, आरोग्य सेविका ताथवडेकर, ग्रामपंचायत व ग्राम दक्षता समितीचे सदस्य उपस्थित होते.

चौकट..

गावाबाहेरील इतर कोणालाही गावात प्रवेश बंद...

‌या कालावधीत गावातील मेडिकल, दूध संकलन केंद्र ही दिवसातील ठराविक वेळ सुरु ठेवण्यात येतील, तर इतर सर्व दुकाने व सेवा पूर्णत: बंद ठेवण्यात येतील. ग्रामस्थांना कोणत्याही कारणास्तव घराबाहेर पडता येणार नाही. शेतीची कामे घरातील एखादं-दुसऱ्या व्यक्तीने गरजेनुसार करावीत. गावातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर कोणालाही गावाबाहेर जाता येणार नाही व गावाबाहेरील कोणालाही गावात प्रवेश दिला जाणार नाही.‌

Web Title: Corona 'hotspot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.