ग्रामीण भागात वाढदिवस साजरे करून दिलं जातंय कोरोनाला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:40 AM2021-05-08T04:40:28+5:302021-05-08T04:40:28+5:30

कुसूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने कोरोनाची साखळी खंडित करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. मात्र ...

Corona is invited to celebrate birthdays in rural areas | ग्रामीण भागात वाढदिवस साजरे करून दिलं जातंय कोरोनाला निमंत्रण

ग्रामीण भागात वाढदिवस साजरे करून दिलं जातंय कोरोनाला निमंत्रण

Next

कुसूर : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने कोरोनाची साखळी खंडित करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. मात्र कऱ्हाड तालुक्यातील कुसूर परिसरात कडक लाॅकडाऊन असतानाही गल्लीबोळांत ग्रुपच्या ग्रुप एकत्र येऊन वाढदिवस साजरे करीत आहेत. परिणामी, कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने जिल्हा अधिकारी यांनी जिल्ह्यात कडक नियमावली जारी केली आहे. मात्र त्याची अंमलबजावणी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी होताना दिसत नाही. शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून अनेक व्यावसायिक आपली दुकाने सुरूच ठेवत आहेत. त्यांना कोणाचेही भय दिसून येत नाही. स्थानिक ग्राम समित्यांनी यासाठी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. मात्र ग्रामीण भागात अनेक गावांत समित्या दिसूनच येत नाहीत.

कुसूर, तारूख आणि परिसरातील वाडीवस्तीवर दररोज सायंकाळच्या वेळेस गल्लीबोळांत एक नवीन दादा - भाई उदयास येत आहे. आजूबाजूच्या गावांतील मित्रमंडळी आणि बगलबच्चे घेऊन सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने जल्लोशात वाढदिवस साजरे होताना दिसत आहेत. या तरुणाईकडून सर्व नियम बासनात गुंडाळून ठेवले जात आहेत. या वेळी त्यांना आवरणे गरजेचे असतानाही रोषाला सामोरे जावे लागेल या भीतीने कोणीही मज्जाव करताना दिसत नाही.

चौकट :

कोरोनाने किड्यामुंग्यांसारखे लोक तडफडून मरत आहेत. याचे कोणतेही गांभीर्य ग्रामीण भागात दिसून येत नाही. लाॅकडाऊन असल्याने नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले तरुण गावी आले आहेत. परिणामी, कामधंदा काही नसल्याने कोणा एका दादाचा वाढदिवस साजरा करायचा आणि पार्ट्यांचे नियोजन करून धुडगूस घालायचा हे सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची साखळी खंडित होईपर्यंत प्रामुख्याने केक विक्रीची दुकाने बंद करणे गरजेचे आहे.

Web Title: Corona is invited to celebrate birthdays in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.