खंडाळा तालुक्यावर कोरोनाचा भार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:11+5:302021-05-15T04:37:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सात हजारांच्या वर पोहोचली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या सात हजारांच्या वर पोहोचली आहे. तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या जवळपास हजारपार झाली आहे. त्यामुळे लोकांना सुविधा पुरविताना प्रशासनावर मोठा भार येत आहे.
शासनाने लॉकडाऊनचे नियम कडक केले असले तरी लोकांचे वागणे बेजबाबदार असल्याचे दिसून येत आहे, तर तालुक्यात अनेक कंपन्यांमध्ये येणारे कामगार कोरोनाबाधित आढळून आले आहेत. ग्रामीण भागात अनेकजण बाधित असताना ते इतर लोकांमध्ये वावरत आहेत. त्यामुळे प्रसार वेगाने होत आहे. तसेच कंपनी प्रशासनाने कामगारांची स्वतंत्र व्यवस्था करणे गरजेचे आहे.
खंडाळा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या सात हजारांवर पोहोचली आहे. मात्र, बेडसंख्या कमी असल्याने सध्या रुग्णांना बेड उपलब्ध होणे मुश्कील झाले आहे. शिरवळ, खंडाळा, लोणंदसह अंदोरी, खेड बुद्रुक, विंग, वाघोशी, सुखेड, शेखमिरेवाडी, अहिरे, मोर्वे, पिंपरे, बाळूपाटलाचीवाडी या गावातून रुग्णसंख्या अधिक आढळल्याने इथली परिस्थिती भयावह आहे. या ठिकाणची व्यवस्था करताना स्थानिक समितीला कसरत करावी लागत आहे. खंडाळा, लोणंद, शिरवळ या शहरी भागात पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला असला तरी ग्रामीण भागात निर्बंध पायदळी तुडवले जात आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. लोकांनीही स्वयंस्फूर्तीने नियम पाळणे आवश्यक आहे.
(चौकट..)
सहा हजारांवर लोकांना डिस्चार्ज
तालुक्यात अहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १४६५, लोणंद केंद्रांतर्गत २४६१ व शिरवळ केंद्रांतर्गत ३३७६ अशी एकूण ७३०२ रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी सहा हजारांवर लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे, तर हजारांवर रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत. यापैकी बहुतांशी विलगीकरण कक्षात आहेत.
(चौकट..)
व्हेंटिलेटर बेड गरजेचे...
तालुक्यात खासगी रुग्णालयातील काही व्हेंटिलेटर बेड सोडले तर इतर ठिकाणी ही सुविधा नाही. सध्या १६९ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ७० बेड सरकारी आहेत. खासगी रुग्णालयात उपचार घेणे सर्वसामान्य लोकांना शक्य नसल्यामुळे सरकारी कोविड केअर सेंटरची बेडसंख्या वाढविणे तसेच तालुक्यात व्हेंटिलेटर बेडची उपलब्धता करणे गरजेचे आहे.
(चौकट..)
खंडाळा ग्रामीण रुग्णालयावर मोठा भार!
तालुक्यात खंडाळा ग्रामीण रुग्णालयावर मोठा भार आहे. त्यातही जगताप हॉस्पिटलला डेडिकेटेड सेंटरचा दर्जा मिळूनही त्या पद्धतीचे उपचार सुरू केले नाहीत. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात गर्दी होत आहे. येथे केवळ १६ ऑक्सिजन बेड आहेत. तरीही येथे सध्या चाळीस रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत. यापैकी काही रुग्णांना जमिनीवरच जागा करावी लागली आहे. जिल्हा प्रशासनाने जगताप हॉस्पिटलला डॉक्टर्स, परिचारिका आणि औषधे उपलब्ध करून दिल्यास लोकांची सोय होऊन दिलासा मिळू शकतो. मात्र मंजुरी मिळून महिना उलटला तरी याकडे डोळेझाक केली जात आहे.