कोरोना सावज हेरतोय... आम्ही बाजारभर फिरतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:40 AM2021-05-12T04:40:35+5:302021-05-12T04:40:35+5:30
पाचगणी : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे हे माहीत असूनही नागरिक विनाकारण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मार्केटची सैर करीत असल्याने ...
पाचगणी : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे हे माहीत असूनही नागरिक विनाकारण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मार्केटची सैर करीत असल्याने अनावश्यक होणारी गर्दी कोरोनाला निमंत्रण देते आहे. यावरून कोरोना सावज हेरतोय तर आम्ही बाजारभर फिरतोय, असेच चित्र दिसत आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी
अत्यावश्यक सेवासुद्धा घरपोच उपलब्ध करून दिली आहे. त्याकरिता पाचगणी पालिका प्रशासनाने सर्वच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांचे नंबर पाचगणीकर नागरिकांना उपलब्ध करून दिले असतानाही नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सकाळच्या सत्रात शिवाजी चौक बाजारपेठेत अनावश्यक होणारी गर्दी कोरोना संसर्गाला निमंत्रित करीत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिक एक सैर व्हावी म्हणून फेरफटका मारायला येत आहेत. हाच फेरफटका कोरोना संसर्ग घेऊन घराच्या उंबरट्याच्या आत नेतोय याचा विसर त्यास नक्कीच पडला आहे. आजही कोरोना अहवाल निगेटिव्ह आला म्हणून घरात न राहता बाजारात फिरणाऱ्याची संख्या अधिक आहे. तर त्याच निगेटिव्ह व्यक्ती पुन्हा बाधित झाल्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. हाच निष्कळजीपणा त्यामुळे हसतखेळत जीवन स्वतःच्या हाताने संपवीत असल्याचे निदर्शनास या निमित्ताने येत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत असंख्य जीव आपण गमावीत आहोत. हे नागरिकांना दिसत आहे. कोरोनाबाधितांना त्याची किंमत मोजावी लागते आहे. तरी पाचगणीकर सुजाण नागरिकांनी कोरोनामुक्त शहर जबाबदार घरचा कर्ता या नात्याने स्वतःला बंधने घालीत बाजारातील फेरफटक्याला स्वतःच आवर घातला तर लवकरच ही पर्यटननगरी कोरोनामुक्त होईल.
चौकट :
पालिका प्रशासन, पोलीस तसेच आरोग्य प्रशासन कोरोना रोखण्याकरिता खूप मेहनत घेत आहेत. त्यांना फक्त नागरिकांची साथ मिळाल्यास कोरोना हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही.
फोटो ११पाचगणी
पाचगणीमध्ये सकाळच्या वेळी अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची अनावश्यक गर्दी
वाढत आहे. यामुळे कोरोनाला निमंत्रण मिळत आहे. (छाया : दिलीप पाडळे)