ओमिक्रॉनचा धोका, आता स्वत:ला रोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 01:39 PM2021-11-29T13:39:43+5:302021-11-29T13:39:58+5:30
कोरोना संक्रमणातून थोडी उसंत मिळतेय तोच ‘ओमिक्रॉन’ने पुन्हा एकदा धोक्याची चाहूल दिली आहे. मात्र नागरिकांनी ही बाब अद्यापही गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसते.
सचिन काकडे
सातारा : कोरोना संक्रमणातून थोडी उसंत मिळतेय तोच ‘ओमिक्रॉन’ने पुन्हा एकदा धोक्याची चाहूल दिली आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी शासनाकडून तातडीने निर्बंधही लागू करण्यात आले, मात्र नागरिकांनी ही बाब अद्यापही गांभीर्याने घेतली नसल्याचे दिसते. सातारा शहरात विनामास्क फिरणाऱ्या व फिजिकल डिस्टन्सचे पालन न करणाऱ्यांची संख्या अधिक असून, नागरिकांनी हा निर्धास्तपणा सोडणे गरजेचे बनले आहे.
जिल्ह्यासह सातारा शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा उतरता क्रम सुरू आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्याची बाजारपेठ पूर्ण क्षमतेने खुली झाली असून, उद्योग-व्यवसायही पूर्ववत झाले आहेत. कोरोनाची लाट ओसरल्याने नागरिकही निर्धास्त झाले. मात्र, कोरोनाचा ओमिक्रॉन या नव्या स्ट्रेनने आरोग्य यंत्रणेचीच नव्हे तर नागरिकांचीदेखील झोप उडविली आहे. कोरोनाचा हा स्ट्रेन अधिक घातक असल्याने केंद्र व राज्य शासनाकडून सुरक्षेचा उपाय म्हणून कार्यक्रमांवर निर्बंध घातले असून, नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमांचे उल्लंंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही शासनाने दिले आहेत. असे असताना सातारा शहरात या उलट चित्र पहायला मिळत आहे.
बहुतांश नागरिक, महाविद्यालयीन तरुणांनी मास्क वापरणे बंद केले आहे. अनेक व्यापारी, विक्रेतेदेखील मास्क लावण्याची तसदी घेत नाहीत. बाजरपेठेत फिजिकल डिस्टन्सचाही सातत्याने फज्जा उडत आहे. कोरोना संक्रमण कमी झाले असताना दुसरीकडे नागरिकांचा निष्काळजीपणा वाढत चालला आहे.
नियमांचे पालक करा...
कोरोनाच्या दोन लाटांचा नागरिकांसह आरोग्य यंत्रणेलाही मोठा फटका बसला. आता ‘ओमिक्रॉन’नेदेखील धोक्याची सूचना दिली आहे. त्यामुळे नागरिकांना निर्धास्तपणा सोडून शासन नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.
मास्क नाही, तर खिशात पैसे ठेवा
- शासनाने मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई केली जाईल.
- त्यामुळे घरातून बाहेर पडणाऱ्या व मास्कचा वापर न करणाऱ्यांना खिशात पाचशेची नोट घेऊनच बाहेर पडावे लागणार आहे.
- मास्कऐवजी रुमाल वापरणारेही दंडात्मक कारवाईस पात्र असतील.
- व्यापारी, विक्रेते व दुकानदारांनाही मास्क, फिजिकल डिस्टन्स बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.