कोरोना चाचणी न करता दुकाने उघडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:25+5:302021-07-02T04:26:25+5:30
सातारा : कोरोना चाचणी केल्याशिवाय दुकाने उघडू नयेत, असे आदेश असताना सातारा शहरातील अनेक दुकानदारांकडून या आदेशाची पायमल्ली केली ...
सातारा : कोरोना चाचणी केल्याशिवाय दुकाने उघडू नयेत, असे आदेश असताना सातारा शहरातील अनेक दुकानदारांकडून या आदेशाची पायमल्ली केली जात आहे. पालिकेच्या कोरोना पथकाने अशा दोन दुकानदारांवर गुरुवारी कारवाई करून प्रत्येकी एक हजार रुपये दंड वसूल केला. याशिवाय विनामास्क फिरणाऱ्या तीन जणांवरही कारवाई करण्यात आली.
कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून संचारबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेसह सर्वच आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे; परंतु संबंधित दुकानदार व व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. जे दुकानदार चाचणी करणार नाहीत अशांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी दिले आहेत. असे असताना शहरातील बहुतांश दुकानदार कोरोना चाचणी न करताच दुकाने सुरू ठेवत आहेत.
पालिकेच्या कोरोना विभागाचे प्रमुख प्रणव पवार यांना ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने कारवाई मोहीम हाती घेतली. गुरुवारी सकाळी पोवई नाक्यावरील एक मोबाईल शॉपी व विसावा नाक्यावरील एका दुकानदारावर
कोरोना चाचणी न करता दुकान सुरू ठेवल्याप्रकरणी प्रत्येकी एक हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी मोबाईल शॉपीत विनामास्क वावरणाऱ्या तीन नागरिकांकडूनही प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. कोरोना रुग्णसंख्या कमी झाली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे संबंधित विक्रेते, दुकानदार व्यापाऱ्यांनी शासन नियमांचे काटेकोर पालन करावे, कोरोना चाचणी केल्याशिवाय कोणीही दुकान उघडू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.