आदर्की परिसरात कोरोना रुग्णसंख्येत वाढ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:27 AM2021-07-18T04:27:26+5:302021-07-18T04:27:26+5:30
आदर्की : फलटण पश्चिम तालुका गत महिन्यात कोरोनामुक्त झाला होता; परंतु गत आठवड्यापासून गावोगावी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, ...
आदर्की : फलटण पश्चिम तालुका गत महिन्यात कोरोनामुक्त झाला होता; परंतु गत आठवड्यापासून गावोगावी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून, संपूर्ण कुटुंब बाधित आढळत असल्याने विलगीकरण कक्ष सुरू करण्याची गरज आहे.
फलटण पश्चिम भागात हिंगणगाव, सासवड, बिबी, घाडगेवाडी, कापशी, आळजापूर, आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक आदी गावांत एप्रिल-मे महिन्यांत कोरोनाचा संसर्ग वाढला. त्याबरोबर मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात वाढल्याने गावातील अनेक कुटुंब गावाबाहेर राहण्यास गेली तर अनेक कुटुंब डोळ्यातून अश्रू ढाळत दार लावून घरात बसली, काही कुटुंब पाहुण्यांकडे गेली होती. त्यावेळी गावातील, घरातील कर्ती व्यक्ती निघून जात होती. शासनाने प्रत्येक गावात विलगीकरण कक्ष उघडण्यास सांगितले. त्यासाठी शासनाने पंधराव्या वित्त आयोगातील २५ टक्के निधी खर्च करण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे काही ग्रामपंचायतींनी संस्थांना बरोबर घेऊन विलगीकरण कक्ष सुरू केले.
बिबी येथे ७५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. हिंगणगाव, कापशी, आळजापूर येथील विलगीकरण कक्षातून शेकडो रुग्ण कोरोनामुक्त झाले. काही गावांत विलगीकरण कक्ष सक्षमपणे सुरू झाली नाहीत त्यांची ससेहेलपट झाली. कोरोना रुग्णांना रुग्णवाहिकेतून जेथे बेड उपलब्ध आहे, त्याठिकाणी नेले जात होते. जून महिन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या कमी झाल्याने अनेक गावे कोरोनामुक्त झाली; पण जुलै महिना उजाडला अन् कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक अंकी होती, ती आळजापुरात एका दिवशी दोन अंकी झाली. त्याबरोबर हिंगणगाव, सासवड, मुळीकवाडी, बिबी, आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक, कोऱ्हाळे येथे कोराना चाचणीत बाधित रुग्ण आढळल्याने कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यामुळे प्रशासन, कोरोना कमिटी, ग्रामस्थ, आरोग्य विभाग यांनी सतर्क झाले पाहिजे तरंच कोरोनाचा ससर्ग थांबविण्यात यश येणार आहे.