कोरोना मोकाट...अन् बाहेरुन येणारेही सुसाट; ना कोणती तपासणी, ना नोंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 04:30 PM2022-01-06T16:30:17+5:302022-01-06T16:30:57+5:30
रुग्णवाढीला परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरु लागला आहे. बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची ना तपासणी केली जात ना कोणत्या नोंदी ठेवल्या जात.
सातारा : जिल्ह्यात एकीकडे ओमायक्रॉन पाय पसरत असतानाच दुसरीकडे कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. या रुग्णवाढीला परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांबरोबरच प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरु लागला आहे. बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची ना तपासणी केली जात ना कोणत्या नोंदी ठेवल्या जात. निर्बंध नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरली होती. हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण दररोज आढळून येत होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, नवीन वर्ष उजाडल्यापासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. गेल्या चारच दिवसांत जिल्ह्यात कोरोनाचे तब्बल ४६८ रुग्ण आढळून आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह प्रशासनही खडबडून जागे झाले आहे.
गतवर्षी लॉकडाऊन कालावधीत जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या होत्या. परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आरोग्य तपासणी केली जात होती. त्याला काही दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात होते. ती व्यक्ती कोरोना बाधित असल्यास तातडीने रुग्णालयात दाखल केले जात होते.
प्रशासनाच्या नजरेतून सुटून जर कोणी घरी आलाच तर शेजारचे नागरिक याची कल्पना प्रशासनाला देत होते. यंदा अशी कोणतीही रुपरेषा प्रशासनाने आखलेली नाही. दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक साताऱ्यात येतात व बाहेर जातात. कोरोनाच्या दोन्ही लाटांमधून बोध घेऊन प्रशासनाने आतापासून कठोर पावले उचलायला हवीत.
यामुळे वाढतेय संक्रमण
- निर्बंध नसल्याने बाजारपेठेत नागरिक, वाहनधारकांची दिवसभर वर्दळ सुरू असते.
- व्यापारी, दुकानदार, विक्रेते व नागरिकांकडून कोरोना नियमावलीचे पालन केले जात नाही.
- गतवर्षी प्रशासनाकडून गृहभेटीद्वारे नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
- कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. यंदा अशी मोहीम राबविण्याबाबत प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.
- कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहीमही प्रभावीपणे राबविली जात नाही.
- परजिल्हा व राज्यातून येणाऱ्या नागरिकांची कोणतीही नोंद ठेवली जात नाही.