जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा दर साडेसात टक्क्यांवर, २९२ जण बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 12:58 PM2022-01-08T12:58:58+5:302022-01-08T13:12:43+5:30
वर्ष अखेरीपासूनच जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. रुग्ण संख्येत दुपटीने रोज वाढ होत आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना वाढीचा दर साडेसात टक्क्यांवर पोहोचला आहे. शनिवारी सातारा जिल्ह्यातील २९२ लोकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. वर्ष अखेरीपासूनच सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. रुग्ण संख्येत दुपटीने रोज वाढ होत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संशयितांच्या तपासण्या करण्यावर भर दिला आहे. शुक्रवारी ४ हजार १९ कोरोना तपासण्या करण्यात आल्या होत्या, यातून २९२ लोक बाधित आढळून आले. गुरुवारी २४२ लोक बाधित आढळले होते यामध्ये आणखी वाढ झाली आहे.
रुग्ण वाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पातळीवरच्या कृती समित्या पुन्हा गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. गावाबाहेरून गावात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करून जे लोक बाधित आढळतील, त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्याबाबत या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रांताधिकारी तहसीलदार, गट विकास अधिकारी, सरपंच, तलाठी, पोलीस पाटील यांच्यावरही रुग्ण वाढ रोखण्याच्या अनुषंगाने जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाधित रुग्ण अत्यवस्थ झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी कोरोना रुग्णालय सज्ज ठेवण्याची लगबग प्रशासनाने सुरू केली आहे.