जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढीचा दर २९ टक्क्यांच्या पुढे, तरी..
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 03:34 PM2022-01-17T15:34:22+5:302022-01-17T15:34:48+5:30
काल, रविवारी चाचण्या कमी झाल्यामुळे तुलनेने रुग्ण संख्या कमी दिसते आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच असून काल, रविवारी केलेल्या चाचण्यांमधून ७९३ लोक बाधित आढळले. त्यामुळे रुग्ण वाढीचा दर २९.२३ टक्के इतका झाला आहे. रुग्ण वाढ होत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे.
जिल्ह्यामध्ये रविवारी २ हजार ७१३ कोरुना चाचण्या करण्यात आल्या होत्या त्यातून ७९३ लोक बाधित आढळून आले आहेत. रविवारी चाचण्या कमी झाल्यामुळे तुलनेने रुग्ण संख्या कमी दिसते आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी ऑक्सिजन व्हेंटिलेटरची गरज असणारे रुग्ण अगदी नगण्य आहेत. या परिस्थितीमध्ये तिसरी लाट म्हणावी इतकी भयावह नाही अशी मानसिकता लोकांमध्ये पाहायला मिळते.
कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यामध्ये अनेक निर्बंध लागू केले आहेत. दहावी बारावीच्या परीक्षा तोंडावर असताना देखील शाळा बंद आहेत. त्यांचे ऑनलाईन क्लासेस होतात. मात्र जितक्या चांगल्या पद्धतीने शाळेत शिकवले जाते ऑनलाइन मध्ये यात मर्यादा येत आहेत.
कोरोना रुग्णांची संख्या मोठी असली तरी गंभीर रुग्णाची संख्या कमी असल्यामुळे सारासार विचार करून प्रशासनाने शाळा सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी अशी पालकांची मागणी आहे.