कोरोना रुग्ण शंभरीजवळ; जम्बो कोविड अजूनही बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2022 05:57 PM2022-01-05T17:57:18+5:302022-01-05T17:57:45+5:30
रुग्णसंख्या शंभरी गाठायला लागली तरी जम्बो हॉस्पिटल बंद ठेवले आहे. या परिस्थितीत आणीबाणीची वेळ आली तर करणार काय, हा प्रश्न सामान्य नागरिकांना सतावतो आहे.
सातारा : जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी तर तब्बल ९८ लोक कोरोनाबाधित आढळले असून, रुग्णसंख्या शंभरी गाठायला लागली तरी अजूनही साताऱ्यातील जम्बो हॉस्पिटल बंद ठेवले आहे. ४०६ रुग्ण विलगीकरणात आहेत. या परिस्थितीत आणीबाणीची वेळ आली तर करणार काय, हा प्रश्न सामान्य नागरिकांना सतावतो आहे.
मागील वर्षी रुग्णांची संख्या वाढली होती. अत्यवस्थ रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्यावर योग्यरीत्या उपचार झाले होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर प्रशासनाने जम्बो कोविड सेंटरला कुलूप लावले, तर जिल्ह्यातील कोविड सेंटर्सही बंद आहेत. हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रशासनाने घरचा रस्ता दाखवला आहे. आता अचानकपणे वैद्यकीय आणीबाणी आली तर परिस्थिती कशी हाताळणार, हा प्रश्न सर्वसामान्यांना सतावतो आहे.
प्रशासनाने वेळीच निर्णय घेऊन कोविड सेंटर सुरू केले तर तिसऱ्या लाटेमध्ये लोकांची पळापळ होणार नाही. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी उभारलेले कोविड सेंटर देखील सुरू करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील स्थिती...
जिल्ह्यातील एकूण बाधित : २ लाख ५२ हजार ७४६
कोरोनामुळे मृत्यू : ६ हजार ४९९
सध्याचे रुग्ण : ४०६
कोरोनामुक्त : २ लाख ४५ हजार २५
जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यासंदर्भात अजून तरी निर्णय झालेला नाही. मात्र, खंडाळा, फलटण, कऱ्हाड आणि म्हसवड येथील कोविड हॉस्पिटलमध्ये यंत्रणा ठेवली आहे. रुग्णसंख्या वाढली तर या ठिकाणी रुग्णांवर उपचार करता येतील. - डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक