चिंताजनक! सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांनी ओलांडला १००चा टप्पा
By नितीन काळेल | Published: April 11, 2023 03:55 PM2023-04-11T15:55:42+5:302023-04-11T15:55:58+5:30
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रुग्ण आढळून येत आहेत
सातारा : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांत वाढ होतच असून, मंगळवारच्या अहवालानुसार नवीन २४ बाधित स्पष्ट झाले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्येने १००चा टप्पाही ओलांडला आहे. तर रुग्णालयात २१ जणांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात मागील तीन वर्षांपासून कोरोना संकट सुरू झाले. सुरुवातीची दोन वर्षे नागरिकांना भीतीत वावरावे लागले. तर प्रशासनाला सतत सतर्क राहण्याची वेळ आली. कोरोनाच्या दोन्ही लाटा मोठ्या ठरल्या. पहिल्यापेक्षा दुसरी मोठी होती. या दोन्ही लाटेत जवळपास अडीच लाख नागरिकांना कोरोनाने गाठले. तर साडेसहा हजारांहून अधिक नागरिकांचा बळी घेतला. गेल्यावर्षी जानेवारीनंतर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका होता; पण कोरोना प्रतिबंधित लसीकरणामुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली नाही.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातच जादा प्रमाणात रुग्ण आढळून आले. मात्र, त्यानंतर कोरोना संकटाला उतरती कळा लागली. त्यामुळे गेले किमान सहा महिने नागरिक तसेच प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडलेला. मात्र, आताच्या मार्च महिन्याच्या मध्यानंतर पुन्हा कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. तर प्रशासनालाही सतत सतर्क राहावे लागत आहे. त्यातच एप्रिल महिना उजाडल्यापासून बाधितांचा आकडा वाढतच चालला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत रुग्ण आढळून येत आहेत.
मंगळवारच्या अहवालानुसार जिल्ह्यात नवीन २४ रुग्ण समोर आले आहेत. यामध्ये बहुतांशी तालुक्यात रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये कऱ्हाड आणि फलटण तालुक्यांत सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी सहा रुग्ण स्पष्ट झाले. त्यानंतर सातारा तालुका ५ आणि जावळी, माण, कोरेगाव, पाटण, वाई तालुक्यांत एक रुग्ण आढळला आहे. जिल्ह्यात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या १०७ झाली आहे.