कोरोनाने ‘रोजी’ थांबली; पण अन्न सुरक्षेतून ‘रोटी’ मिळाली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:47+5:302021-05-13T04:39:47+5:30
कऱ्हाड : कोरोनामुळे ‘रोजी’ थांबेल; पण ‘रोटी’ थांबू देणार नाही, असा दिलासा राज्य शासनाने ‘लॉकडाऊन’वेळी दिला होता. त्याचीच पूर्तता ...
कऱ्हाड : कोरोनामुळे ‘रोजी’ थांबेल; पण ‘रोटी’ थांबू देणार नाही, असा दिलासा राज्य शासनाने ‘लॉकडाऊन’वेळी दिला होता. त्याचीच पूर्तता म्हणून अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप सुरू करण्यात आले असून लाभार्थ्यांना राज्य आणि केंद्र शासनाकडून धान्याचा दुहेरी लाभ होत आहे. कऱ्हाड तालुक्यात हजारो कुटुंबातील चुलींवर हे धान्य शिजणार आहे.
गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सामान्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता. व्यवसाय बंद पडल्यामुळे अनेकांची अन्नान्न दशा झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे लॉकडाऊन हटविण्यात आले. सर्वकाही पूर्वपदावर येत असतानाच यंदा फेब्रुवारीपासून पुन्हा संक्रमण वाढले. एप्रिलमध्ये राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊन पुकारण्याचा निर्णय घेतला. मात्र, गतवर्षीचा कटू अनुभव पाहता त्याला विरोध झाला. त्यावेळी संक्रमण रोखण्यासाठी दुसरा पर्याय नसल्याचे सांगून राज्य शासनाकडून जनतेला दिलासा देण्यात आला. मोफत धान्य पुरविण्याची घोषणा त्यावेळी करण्यात आली. सध्या त्याची पूर्तता केली जात आहे.
अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप सुरू करण्यात आले असून राज्य शासनाकडून मिळणाऱ्या धान्याबरोबरच लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण’ योजनेतूनही धान्य मिळणार आहे. कऱ्हाड तालुक्यात गावोगावी त्याचे वितरणही सुरू झाले आहे.
- चौकट (फोटो : १२केआरडी०३)
कुणाला मिळणार धान्य..?
अन्न सुरक्षा योजनेतील पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारकांना हे धान्य मिळणार आहे. थोडक्यात ज्यांना प्रत्येक महिन्याला सवलतीच्या दरात रेशनिंग धान्य मिळते, त्याच कार्डधारकांना या धान्याचा लाभ मिळणार असून हे धान्य पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे.
- चौकट
कऱ्हाड तालुका...
७८००० : लाभार्थी
२८५ : दुकानदार
- चौकट
लाभार्थ्यांना प्रतीमाणसी मिळणार...
राज्य शासनाकडून -
३ किलो : गहू
२ किलो : तांदूळ
गरीब कल्याण योजनेतून -
३ किलो : गहू
२ किलो : तांदूळ
एकूण-
६ किलो : गहू
४ किलो : तांदूळ
- चौकट (फोटो : १२केआरडी०४)
अंगठा नको, नियम पाळा!
धान्य वितरणावेळी लाभार्थ्यांना ‘थम्ब’ करावे लागते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्याचा अंगठा घेणे बंद करण्यात आले आहे. दुकानदारांच्या अंगठ्यावरच लाभार्थ्यांना धान्य दिले जाणार असून धान्य घेण्यासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांनी कोरोनाच्या अनुषंगाने नियमांचे पालन करावे. सोशल डिस्टंन्सिंग ठेवावे. मास्क वापरावा, असे आवाहन पुरवठा निरीक्षक गोपाल वसू व विलास गभाले यांनी केले आहे.
- कोट
कऱ्हाड तालुक्यात अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्याचे वाटप सुरू करण्यात आले असून ३१ मे अखेरपर्यंत ते सुरू राहणार आहे. धान्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी रेशनिंग दुकानावर गर्दी करू नये. नियमांचे पालन करावे.
- अमरदीप वाकडे
तहसीलदार, कऱ्हाड
फोटो : १२केआरडी०२
कॅप्शन : प्रतीकात्मक