मलकापुरात मार्चमध्ये कोरोनाचा पुन्हा चढता आलेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:40 AM2021-03-27T04:40:03+5:302021-03-27T04:40:03+5:30
मलकापूर : गेल्या तीन महिन्यांत मलकापुरात ७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात आतापर्यंत एकूण १ हजार १५८ ...
मलकापूर : गेल्या तीन महिन्यांत मलकापुरात ७२ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात आतापर्यंत एकूण १ हजार १५८ बाधित झाले. त्यापैकी १ हजार १०५ जणांनी कोरोनावर मात केली, तर ३६ जणांचा मृत्यू झाला. उपचारार्थ १७ जणांपैकी रुग्णालयात केवळ ४ जण उपचार घेत असून १३ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
शहरातील कोरोनाचा मंदावलेला रेट पुन्हा मार्च महिन्यात वाढत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मलकापुरातील कोरोना मुक्तीचा दर वाढून ९५.४ टक्क्यांवर आहे. शहराचा मृत्यू दर ३.१ टक्क्यावर स्थिर आहे, तर उपचार घेत असलेल्या रुग्णांचे प्रमाण १.५ टक्के आहे.
‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबविल्यामुळे मलकापुरात डिसेंबर ते फेब्रुवारी या तीन महिन्यात बाधितांचा आकडा वेगाने कमी कमी होत गेला. त्यापूर्वी पहिल्या टप्प्यात एका महिन्यात शहरात ३१ रुग्ण झाले होते. पालिका, शासन व आरोग्य विभागाने कोरोना लढ्याचे योग्य नियोजन केल्याने व उपचाराने एका महिन्यातच शहरातील सर्व ३१ रुग्ण बरे झाले होते. मात्र एका महिन्याच्या विश्रांतीनंतर २६ जून २०२० ला पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाचा शिरकाव झाला आणि शहरात टप्प्या-टप्प्याने रुग्ण वाढतच गेले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत तर कोरोनाने कहर केला होता. दिवसाला २५ ते ३० जण बाधित येत होते. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला दिवसाला दहा ते बाराजण, तर शेवटी केवळ ३-४ च रुग्ण सापडले. नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सरासरी २-३ जण बाधित येत होते. डिसेंबर महिन्यात केवळ अठराजणच बाधित सापडल्याने दिवसाला एकही सापडला नाही.
या महिन्यात काही वेळेला आठ दिवस एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नव्हता. याबरोबरच या महिन्यात एकही मृत्यू झाला नाही. शहरात हळूहळू संख्या कमी झाली असली तरी, बाधित होण्याचे थांबलेले नाही. याउलट जानेवारी महिन्यात १५ फेब्रुवारीमध्ये १९, तर मार्च महिन्यात २५ दिवसात ३४ रुग्ण वाढले आहेत. यावरून मलकापुरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असल्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. त्यानुसार पालिकेने शहरात खबरदारी म्हणून पुनर्सर्वेक्षण सुरू केले आहे.
चौकट
१. २२ एप्रिल ते २४ मे - ३१
२) २५ मे ते २५ जून - ०
३) २६ जून ते २६ जुलै - ४३
४) २७ जुलै ते २६ ऑगस्ट - ३३८
५) २७ ऑगस्ट ते २६ सप्टेंबर - ४२८
६) २७ सप्टेंबर ते २७ ऑक्टोबला - १५९
७) २८ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर - ६९
८) २८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर - १८
९) ३१ डिसेंबर ते ३० जानेवारी - १५
१०) ३१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी - १९
११) १ मार्च ते २५ मार्च - ३३
चौकट
सात ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित
मलकापुरात प्रतिबंधित क्षेत्र ७
आगाशिवनगरात इंद्रप्रस्थ कॉलनी, दत्त कॉलनी, सर्वोदय कॉलनी व त्रिमूर्ती कॉलनी असे ४, तर खंडोबानगर, व्यंकटेश कॉलनी लाहोटीनगर व शिक्षक कॉलनी असे शहरात एकूण सात ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहे.