जिल्हा कारागृहात कोरोनाचा पुन्हा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:38 AM2021-03-21T04:38:14+5:302021-03-21T04:38:14+5:30
सातारा : जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शुक्रवारी तीन बंदिवानांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय ...
सातारा : जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये शुक्रवारी तीन बंदिवानांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, गतवर्षीनंतर कारागृहात पुन्हा कोरोनाने इंट्री केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, सातारा शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. सातारा जिल्हा कारागृह शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. कारागृहालगत सातारा शहर पोलीस ठाणे व पोलीस वसाहत देखील आहे. अशा गजबजलेल्या परिसरातील कारागृहात तीन रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे. तीन बंदिवानांची प्रकृती स्थिर असून शुक्रवारी दुपारी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, सातारा कारागृहात सुमारे दोनशे ते अडीचशे बंदिवान आहेत. याबरोबरच कारागृहातील पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात असतात. गतवर्षी पुण्यातून आलेल्या बंदिवानामुळे जिल्हा कारागृहात कोरोनाची लागण झाली होती. मात्र, यंदा असा कोणताही बंदिवान कारागृहात न येताही कोरोनाचा शिरकाव झाल्याने कारागृह प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सिव्हिलमधील वैद्यकीय पथक सकाळ-संध्याकाळ बंदिवानांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करीत आहेत. सध्या कारागृहात आणखी काय उपाययोजना केल्या आहेत का याची नेमकी परिस्थिती कशी आहे हे सांगण्यास मात्र अधिकाऱ्यांनी नकार दिला.