जिल्ह्यातील सव्वाचार टक्के लोकसंख्येला गाठले कोरोनाने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:38+5:302021-05-15T04:37:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना विस्फोट सुरूच असून १ एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल ६७ हजार बाधितांची वाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना विस्फोट सुरूच असून १ एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल ६७ हजार बाधितांची वाढ झाली आहे, तर ११५१ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३३ हजारांच्या पुढे गेली आहे. म्हणजे जवळपास सव्वाचार टक्के लोकसंख्येला आतापर्यंत कोरोनाने गाठलेले आहे. याला कारण म्हणजे लोकांत अजूनही कोरोनाविषयक गांभीर्य नाही हेच खऱ्या अर्थाने समोर येत आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षीच्या सप्टेंबरपर्यंत ३८ हजारांवर रुग्ण आढळून आले होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात होती. पण, फेब्रुवारीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. एप्रिल महिन्यापासून तर कोरोनाबाधितांचा कहरच सुरू झाला. दुसऱ्या लाटेची तीव्रता पहिल्यापेक्षा अडीच ते तीन पटीने अधिक आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सध्या दररोज दोन हजारांवर रुग्ण आढळून येत आहेत. याला कारण म्हणजे कोरोना विषाणूबाबत लोकांत नसणारे गांभीर्य, शासन नियमांचा विसर, विविध ठिकाणी गर्दी करणे हे आहे. त्याचबरोबर आढळून येणाऱ्यांपैकी जवळपास ६० ते ७० टक्के रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. या रुग्णांचा वावर घरात असतो. मला काय होतंय, ही भावनाच घरातील अनेकांना कोरोनाजवळ घेऊन जात आहे. त्याचबरोबर विलगीकरणातील बाधित लवकरच घराबाहेर पडतात. लोकांत मिसळल्यास त्यातूनही बाधितांची संख्या वाढण्यास हातभार लागत आहे. अशा रुग्णांवर वचक राहिलेलाच नाही. त्यातच जिल्ह्यात लॉकडाऊन असला तरी नागरिक काही ना काही निमित्ताने बाहेर पडत आहेत. शासन नियमांचा विसर पडला आहे. यातूनच बाधित वाढत चालले आहेत.
जिल्हा प्रशासनाचे काम सुरूच आहे. आजही ६० टक्के यंत्रणेवर कोरोनाशी मुकाबला करण्यात येतोय. पाहिजे तेवढ्या प्रमाणात आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ तसेच इतर साहित्यही नाही. तरीही पूर्वीपेक्षा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढले आहे. पण, लोकांची बेफिकिरीच कोरोनाला जवळ करत आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता १ लाख ३३ हजारांच्या पुढे गेला आहे. म्हणजे जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ३१ लाख असताना जवळपास सव्वाचार टक्के लोकांना कोरोना झाल्याचे वास्तव समोर आले आहे. तर आतापर्यंत कोरोनाने ३०६१ लोकांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे १ एप्रिलपासून कोरोनाचा कहर आहे. मागील दीड महिन्यात जिल्ह्यात ६७ हजार नवीन रुग्ण वाढले, तर ११५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी सातारा जिल्ह्यात कोरोना किती वेगाने वाढू लागलाय हेच दर्शवीत आहे.
चौकट :
ग्राम दक्षता समित्या नावालाच; कंटेनमेंट झोन कमी...
कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात गावपातळीवर कोरोना रुग्ण कमी दिसून आले. याला कारण, ग्राम दक्षता समित्या सक्रिय होत्या. बाहेरून आलेल्या नागरिकांना विलगीकरण करून ठेवले जात होते. पण, आता गावागावांत ‘आओ-जाओ’ अशी स्थिती आहे. कंटेनमेंट झोन पूर्वी मोठ्या प्रमाणात होते. आता या झोनला लोकांचा विरोध होतोय. त्यामुळे प्रशासन सतर्क असले तरी लोकांकडूनही त्याला सहकार्य पाहिजे तेवढे मिळताना दिसत नाही. अशा कारणांमुळेही कोरोनाबाधित वाढत आहेत.
.........