जिल्ह्यातील साडेसहा टक्के नागरिकांना गाठले कोरोनाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:25 AM2021-07-08T04:25:42+5:302021-07-08T04:25:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरूच असून, दि. १ एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल १ लाख ३३ ...

Corona reaches six and a half percent citizens of the district! | जिल्ह्यातील साडेसहा टक्के नागरिकांना गाठले कोरोनाने!

जिल्ह्यातील साडेसहा टक्के नागरिकांना गाठले कोरोनाने!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचे संकट सुरूच असून, दि. १ एप्रिलपासून आतापर्यंत तब्बल १ लाख ३३ हजार बाधितांची वाढ झाली तर २,८८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर असून, जवळपास साडेसहा टक्के लोकसंख्येला आतापर्यंत कोरोनाने गाठले आहे. याला कारण म्हणजे लोकांमध्ये अजूनही कोरोनाविषयक गांभीर्य नाही, हेच खऱ्या अर्थाने समोर येत आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यात गेल्यावर्षीच्या सप्टेंबरपर्यंत ३८ हजारांवर रुग्ण आढळले होते. मात्र, ऑक्टोबर महिन्यापासून रुग्णसंख्या हळूहळू कमी होत गेली. जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील कोरोना स्थिती नियंत्रणात होती. पण, फेब्रुवारीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत गेली. एप्रिल महिन्यापासून तर कोरोनाबाधितांचा कहरच सुरू झाला. दुसऱ्या लाटेची तीव्रता पहिलीपेक्षा अडीच ते तीनपटीने अधिक आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सध्या दररोज दोन हजारांवर रुग्ण आढळून येत होते. याला कारण म्हणजे कोरोना विषाणूबाबत लोकांत नसणारे गांभीर्य, शासन नियमांचा विसर, विविध ठिकाणी गर्दी करणे हे आहे.

जिल्ह्यात आढळून येणाऱ्यांपैकी जवळपास ६० ते ७० टक्के रुग्ण हे गृह अलगीकरणात असायचे. या रुग्णांचा वावर घरात होता. मला काय होतंय, ही भावनाच घरातील अनेकांना कोरोनाजवळ घेऊन गेली होती. त्याचबरोबर विलगीकरणातील बाधित लवकरच घराबाहेर पडत होते. लोकांत मिसळल्यास त्यातूनही बाधितांची संख्या वाढण्यास हातभार लागला. अशा रुग्णांवर वचक राहिलेलाच नव्हता.

जिल्ह्यातील आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ कमी आहे. तरीही कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढले आहे. पण, लोकांची बेफिकिरीच कोरोनाला जवळ करत आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा आता १ लाख ९९ हजार ४८८वर गेला आहे. म्हणजे जिल्ह्याची लोकसंख्या अंदाजे ३१ लाख असून, त्यामधील ६.४५ टक्के लोकांना कोरोना झाल्याचे वास्तव समोर आले आहे. तर आतापर्यंत कोरोनाने ४,७९४ लोकांचा बळी गेला आहे. विशेष म्हणजे १ एप्रिलपासून कोरोनाचा कहर आहे. गत तीन महिन्यांत जिल्ह्यात १ लाख ३३ हजार ४२५ नवीन रुग्ण वाढले तर २,८८४ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी सातारा जिल्ह्यात कोरोना किती वेगाने वाढू लागलाय, हेच दर्शवित आहे.

चौकट :

ग्राम दक्षता समित्या नावालाच; कन्टेनमेंट झोन कमी...

कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात गाव पातळीवर कोरोना रुग्ण कमी दिसून आले. याला कारण, ग्राम दक्षता समित्या सक्रिय होत्या. बाहेरुन आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करुन ठेवले जात होते. पण, आता गावागावांत ‘आओ-जाओ’ अशी स्थिती आहे. कन्टेनमेंट झोन पूर्वी मोठ्या प्रमाणात होते. आता या झोनला लोकांचा विरोध होतोय. त्यामुळे प्रशासन सतर्क असले तरी लोकांकडूनही त्याला पाहिजे तेवढे सहकार्य मिळताना दिसत नाही. अशा कारणांमुळेही कोरोनाबाधित वाढत आहेत.

.........

११ लाख लोकांची तपासणी...

जिल्ह्यात गत सव्वा वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. आतापर्यंत कोरोनाच्या संशयित ११ लाख ३४ हजार ९१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये जवळपास २ लाख लोक बाधित आढळले आहेत.

..................................................................

Web Title: Corona reaches six and a half percent citizens of the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.