सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झाली कमी, जाणून घ्या सध्यस्थितीतील सक्रिय रुग्णांचा आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 05:50 PM2022-09-06T17:50:55+5:302022-09-06T17:51:33+5:30
२०२२ मध्ये फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. एप्रिलपर्यंत रुग्ण वाढत गेले. पण, दुसऱ्या लाटेसारखी तीव्रता दिसली नाही.
सातारा : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत चालली असून, सोमवारच्या अहवालानुसार नवीन दोन रुग्णांची वाढ झाली आहे. तर जिल्ह्यात सध्यस्थितीत सक्रिय रुग्णांचा आकडा ४३ पर्यंत खाली आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. पहिल्यापेक्षा दुसरी लाट मोठी ठरली. त्यावेळी २०२१ या वर्षातील मे या एकाच महिन्यात ६० हजारांहून अधिक कोरोनाबाधित झाले होते. त्यानंतर जूनपासून कोरोना संकट कमी झाले. तसेच लाटही ओसरण्यास सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यापर्यंत रुग्ण कमी होते. पण, २०२२ मध्ये फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली. एप्रिलपर्यंत रुग्ण वाढत गेले. पण, दुसऱ्या लाटेसारखी तीव्रता दिसली नाही. त्यानंतर तर कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी-अधिक होत होते. तरीही १०० च्या वर कधीही रुग्णसंख्या गेली नाही.
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. सोमवारच्या अहवालानुसार, नवीन दोन रुग्ण वाढले आहेत. तर कोरोनातून बरे झालेल्या तिघांना घरी सोडण्यात आले. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या ४३ इतकी आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ८० हजार ४२२ रुग्णांची नोंद झाली. तर ६ हजार ७१५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.