खंडाळा तालुक्यात कोरोना पुन्हा बळावतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:39 AM2021-03-18T04:39:14+5:302021-03-18T04:39:14+5:30
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत दोनशेपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह ...
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत दोनशेपेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १७९ जण अद्यापही उपचार घेत आहेत. लोकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन तहसीलदार दशरथ काळे यांनी केले आहे.
शासनाने लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर लोकांनी निर्बंध पाळणे बंद केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १ मार्चपासून तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ९९, लोणंद केंद्रांतर्गत ६७ तर अहिरे केंद्रांतर्गत ५५ अशी एकूण २२१ झाली आहे. ही संख्या झपाट्याने वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.
खंडाळा तालुक्यातील ६२ गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या ३६७० पर्यंत पोहोचली आहे. मंगळवारी एकाच दिवसात तालुक्यातील शिरवळ ६, मिरजे ६, लोणंद ९, खंडाळा ५, बावडा १, अहिरे १, घाटदरे १, सांगवी २ अशी रुग्णसंख्या आढळल्याने धास्ती वाढली आहे.
नगरपंचायत क्षेत्रात प्रशासनाने नियम काटेकोर करणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवून लोकांना नियम पाळणे बंधनकारक करायला हवे.
(कोट)
खंडाळा तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. तालुक्यात उपचाराची चांगली सुविधा उपलब्ध असली तरी अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे, तसेच जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावे तरच कोरोनाला आळा घालणे शक्य होणार आहे. अन्यथा गतवर्षीप्रमाणे पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रशासनानेसुद्धा नियमांची कडक अंमलबजावणी करायला पाहिजे.
-डॉ. नितीन सावंत, लोणंद.