खंडाळा तालुक्यात पुन्हा बळावतोय कोरोना...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:55+5:302021-05-24T04:37:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आठ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खंडाळा : खंडाळा तालुक्यात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आठ हजारांच्या वर पोहोचली आहे. तालुक्यात गेल्या चार दिवसांपूर्वी कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. मात्र, या दोन दिवसांत पुन्हा संख्या वाढत आहे. चाळीशीच्या घरात रोडावलेली संख्या पुन्हा शंभरीच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना पुन्हा बळवतोय अशी स्थिती आहे.
खंडाळा तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाने हातपाय पसरले असून, कोरोनाची एकूण संख्या ८,९५९ वर पोहोचली आहे. सध्या शेकडो पॉझिटिव्ह रुग्ण असल्याने मात्र बेड संख्या कमी पडत आहेत. शिरवळ, खंडाळा, लोणंदसह खेड बुद्रुक, विंग, वाघोशी, सुखेड, शेखमिरेवाडी, अहिरे, मोर्वे, पिंपरे, बाळूपाटलाचीवाडी या गावातून रुग्णसंख्या अधिक आढळल्याने इथली परिस्थिती आटोक्यात आणणे आवश्यक आहे. या ठिकाणची व्यवस्था करताना स्थानिक समितीला कसरत करावी लागत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नवीन आदेशानुसार खंडाळा, लोणंद, शिरवळ या शहरी भागात पोलीस प्रशासनानेही चोख बंदोबस्त ठेवला असला तरी ग्रामीण भागात अद्यापही निर्बंध पायदळी तुडविले जात आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. लोकांनीही स्वयंस्फूर्तीने नियम पाळणे आवश्यक आहे.
चौकट..
बहुतांशी विलगीकरण कक्षात
तालुक्यात एकूण ८,९५९ रुग्णसंख्या झाली आहे. यापैकी साडेसात हजारांवर लोकांना डिस्चार्ज मिळाला आहे तर हजारांच्या जवळपास रुग्ण अद्यापही उपचार घेत आहेत. यापैकी बहुतांशी विलगीकरण कक्षात आहेत.
चौकट..
मृत्यूचे प्रमाण वाढले
कोरोनातून सावरण्यासाठी प्रत्येक गावातून सर्वेक्षण सुरू आहे. तरीही रुग्णसंख्या वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यात ३८ व ३९ रुग्णसंख्या होती. मात्र, अलीकडील दोन दिवसांत ९८ व ८८ वर पोहोचली आहे तर दोन दिवसांत तालुक्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.