ग्रामीण भागात कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:48+5:302021-05-25T04:43:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे दिसून येत ...

Corona in rural areas | ग्रामीण भागात कोरोना

ग्रामीण भागात कोरोना

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : कोरोनाच्या पहिल्या लाटेत सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेत मात्र असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागात कोरोना फैलावण्याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई-पुण्याहून आरामबस अक्षरश: प्रवाशांनी तुडुंब भरून रातोरात येत आहेत. या प्रवाशांकडे ना ई-पास आहे, ना कोरोना चाचणी केल्याचे प्रमाणपत्र, त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना कसा आटोक्यात येणार, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी मुंबई-पुण्याहून लोक आपापल्या गावी आले होते. यातील काहींना गृह अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये गतवर्षी फारसे रुग्ण आढळले नाहीत. त्यावेळी ग्रामीण भाग सुरक्षित होता. मुंबई-पुण्याहून एखादा व्यक्ती गावात आल्यानंतर त्या व्यक्तीला सक्तीने दहा दिवस गृह अलगीकरणामध्ये ठेवले जात होते. मात्र, दुसऱ्या लाटेमध्ये ग्रामस्थांबरोबरच प्रशासनाचाही गाफीलपणा समोर आला. गावात बाहेरून कोणतीही व्यक्ती आली तर त्या व्यक्तीची ना चाचणी केली जात होती ना त्या व्यक्तीला गृह अलगीकरणात ठेवले जात होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना प्रचंड वेगाने फैलावला. आता तर मुंबई-पुण्याहून प्रवाशांच्या आरामबस रातोरात गावी येऊ लागल्या आहेत. या बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांकडे ना ई-पास आहे, ना त्यांची कोरोना चाचणी झाली आहे. आपलेच लोक गावी येताहेत म्हटल्यावर ग्रामस्थांनीही अबोला धरून तक्रार केली नाही. त्याचे परिणाम आता सर्वांनाच भोगायला लागत आहेत. संपूर्ण गावे कोरोनाबाधित आढळून येऊ लागली आहेत. मुंबई, पुण्याहून या आरामबस सातारा जिल्ह्यात प्रवेश करत असताना, सातारचे पोलीस काय करत आहेत, असाही प्रश्न नागरिकांकडून आता विचारला जात आहे. मुंबई, पुण्याहून आलेल्या प्रवाशांमध्ये अनेकजण कोरोनाबाधित असू शकतात. त्यांची कोरोना चाचणी झाली तर कोरोनाचा संसर्ग गावात होण्यापासून रोखला जाऊ शकतो. सध्या कोरोनाची कसलीही लक्षणे नसतानाही अनेकांचा अहवाल बाधित येत आहे. असे लोक गावामध्ये इकडून-तिकडे फिरत असतात. मात्र, तोपर्यंत अशा लोकांकडून अनेकजण बाधित झालेले असतात. पहिल्या लाटेमध्ये सुरक्षित असलेला ग्रामीण भाग दुसऱ्या लाटेमध्ये असुरक्षित कसा झाला, याचे सर्वांनाच कोडे पडले होते. मात्र, गत महिनाभरापासून ग्रामीण भागामध्ये मुंबई-पुण्याहून आलेल्या प्रवाशांची संख्या पाहता, याचे कोडे चटकन प्रशासनासह आरोग्य विभागालाही उलगडले. मात्र, तोपर्यंत गावेच्या गावे बाधित झाली होती. परंतु, अजूनही वेळ गेलेली नाही. अशाप्रकारची रातोरात होणारी बेकायदा वाहतूक जिल्हा प्रशासनाने रोखायला हवी, तरच ग्रामीण भागात घोंगावणारे कोरोनाचे संकट आटोक्यात येईल. अन्यथा ग्रामीण भागातील परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

चौकट : गाव तुमचंच आहे पण काळजी घ्या!

वाढत्या कोरोनाच्या धास्तीने मुंबई-पुण्याहून लोक आपापल्या गावी येत आहेत. आपल्या स्वतःच्या घरी येणे, हा त्यांचा हक्कच आहे. मात्र, गावी येताना आपण आपल्या कुटुंबाचा, आपल्या गावकऱ्यांचा जीव धोक्यात तर घालत नाही ना, याचा विचारही मुंबई, पुण्याहून येणाऱ्या प्रवाशांनी करणे गरजेचे आहे. स्वतःची कोरोना चाचणी करून घेत ती निगेटिव्ह असेल आणि तुम्ही गावात आलात तर त्याचा कोणालाही त्रास नाही. मात्र, चाचणी न करता तुम्ही स्वतःचा आणि गावकर्‍यांचा तसेच कुटुंबाचाही जीव धोक्यात घालत आहात, हे विसरू नका. गाव तुमचंच आहे पण काळजी घ्या, असे म्हणण्याची वेळ आता गावकऱ्यांवर आली आहे.

Web Title: Corona in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.