corona in satara : लढवय्या मुलीला खाकी म्हणाली, हॅप्पी बड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 06:19 PM2020-05-22T18:19:33+5:302020-05-22T18:22:56+5:30
लोणंदमधील एका चिमुकलीला तिच्या वाढदिवसादिवशीच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तिला पोलिसांनी चिमुरडीला शब्द दिला होता की, बाळा, दवाखान्यातून बरी होऊन आल्यावर केक कापून दणक्यात वाढदिवस साजरा करू, अन् तो शब्द पोलिसांनी पाळला.
लोणंद : लोणंदमधील एका चिमुकलीला तिच्या वाढदिवसादिवशीच कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. तिला जिल्हा शासकीय रुग्णालयात न्यावे लागणार होते. वाढदिवसादिवशीच ही वेळ आल्याने कुटुंबीय हतबल झाले होते; पण पोलिसांनी चिमुरडीला शब्द दिला होता की, बाळा, दवाखान्यातून बरी होऊन आल्यावर केक कापून दणक्यात वाढदिवस साजरा करू, अन् तो शब्द पोलिसांनी पाळला.
याबाबत माहिती अशी की, लोणंद येथील एका मुलीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आली. योगायोगाने त्याच दिवशी तिचा वाढदिवसही होता. वय किती? असा प्रश्न अधिकाऱ्यांनी विचारला तेव्हा, तिला आजच १३ वर्षे पूर्ण होत आहेत. आजच वाढदिवस असल्याचे घरातील लोकांनी सांगितले. त्यावेळी उपस्थित सर्वजण काहीवेळ नि:शब्द झाले.
वाढदिवसाच्या दिवशीच तिला १४ दिवसांसाठी या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आई-वडिलांना सोडून सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती व्हावे लागणार होते. त्याचवेळी लोणंदचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी त्या मुलीला शब्द दिला की, तू घरी परत आल्यावर तुझा वाढदिवस केक कापून दणक्यात साजरा करू.
या चिमुरडीने जिल्हा रुग्णालयात झुंज देऊन गुरुवारी कोरोनावर मात केली. गुरुवारी ती रुग्णालयातून बरी होऊन हसतमुखाने आपल्या लोणंद येथील घरी परतली. सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांनी त्या मुलीला जाताना दिलेला शब्द पाळला.
चौधरी व खंडाळ्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, रोहित निंबाळकर, पोलीस हवालदार फैय्याज शेख, अविनाश शिंदे आदींनी तिच्या घरी जाऊन तिचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा केला. त्यावेळी तिचे आई-वडील, लहान भाऊ, बहीण व नातेवाईक उपस्थित होते.
फुलांची उधळण
सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोरोनामुक्त होऊन चिमुरडी घरी गेली, तेव्हा औक्षण करून तिचे कुटुंबीयांनी घरात स्वागत केले. तर शेजारचे मंडळी, इतर नागरिकांनी फुलांची उधळण करत तिचे कौतुक केले.