राजवाडा भाजी मंडईतील सात विक्रेत्यांना कोरोना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:41 AM2021-04-20T04:41:24+5:302021-04-20T04:41:24+5:30
सातारा : मंगळवार तळे मार्गावर असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडईतील तब्बल सात भाजी विक्रेत्यांना कोरोनाचे ...
सातारा : मंगळवार तळे मार्गावर असलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह उर्फ दादा महाराज भाजी मंडईतील तब्बल सात भाजी विक्रेत्यांना कोरोनाचे लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. पालिकेने सुरक्षिततेसाठी पुढील तीन दिवस मंडई बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येथील सर्व विक्रेत्यांची कोरोना चाचणी झाल्यानंतर मंडई सुरू केली जाणार आहे.
कोरोनाचे संक्रमण वाढू लागल्याने सातारा पालिकेने उपाययोजनांची तीव्रता वाढवली आहे. शहरातील भाजी विक्रेते, व्यापारी, दुकानदार, हातगाडीधारकांना कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजवाडा चौपाटीवरील चार विक्रेत्यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर खण आळीतील एका दुकानातही सात कर्मचारी बाधित आढळले. आता राजवाडा भाजी मंडईतील सात भाजी विक्रेत्यांचे अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी तत्काळ मंडई बंद करण्याचे आदेश देऊन सर्वच भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत. जोपर्यंत येथील सर्व विक्रेत्यांची चाचणी होत नाही व त्यांचे अहवाल प्राप्त होत नाहीत, तोपर्यंत पुढील तीन दिवस मंडई बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, पालिकेच्या आरोग्य विभागाने भाजी मंडईचा संपूर्ण परिसर निर्जंतुक केला.