कोरोनामुळे गावोगावी टाळ-मृदुंगाचा निनाद थांबला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:47+5:302021-05-24T04:37:47+5:30
तरडगाव : गतवर्षीपासून कमी - जास्त प्रमाणात शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या संचारबंदी असल्याने साहजिकच ...
तरडगाव : गतवर्षीपासून कमी - जास्त प्रमाणात शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात कोरोनाने थैमान घातले आहे. सध्या संचारबंदी असल्याने साहजिकच सर्वत्र धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम बंद आहेत. गावागावातील मंदिरांमध्ये कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताहसारखे विविध धार्मिक कार्यक्रम होताना दिसत नाहीत. यामुळे टाळ-मृदुंग, विणा, पखवाजाचा निनाद थांबला आहे.
फलटण तालुक्याला धार्मिक पार्श्वभूमी आहे. वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन दरवर्षी तालुक्यातून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावाने पंढरपूरला जात असतो. कोरोनामुळे मागील वर्षी हे चित्र दिसले नाही, तर या वर्षीही कोरोनाचा उद्रेक पाहता याची शक्यता वाटत नाही. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्यावतीने धार्मिक कार्यक्रम स्थागित केले आहेत.
खरे तर मार्च महिन्यापासून यात्रा, हरिनाम सप्ताह कार्यक्रम सुरू होतात. या काळातच गावोगावी सामूहिक भजन, कीर्तन, प्रवचन तसेच मंदिरांमध्ये सायंकाळी हरिपाठ चालत असतात. याला टाळ, वीणा, पखवाजाची साथ असते. मात्र, नेमके त्या महिन्यातच गतवर्षी लॉकडाऊन सुरू झाला होता. हरिनाम सप्ताहात काकडा आरती, भजन, गाथा पारायण तसेच स्नेहभोजन कार्यक्रम सुरू असतात. प्रत्येक एकादशीनिमित्त गावोगावी धार्मिक कार्यक्रम असतात. दरम्यान, मंदिर परिसरात आनंदमय वातावरण असते. राम नवमीचा कार्यक्रमदेखील उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र, संचारबंदी तर कधी लॉकडाऊन यामुळे हे कार्यक्रम रद्द झाल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट दिसत आहे. अनेक ठिकाणी सप्ताहाची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी दोन-तीन व्यक्तिंना मंदिरात बसवून गाथा पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण पार पाडले गेले.