विकासाची ‘लाईफ लाईन’ कोरोनाने ठप्प!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:38 AM2021-04-11T04:38:08+5:302021-04-11T04:38:08+5:30
कऱ्हाड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राची ‘लाईफ लाईन’. दिवसाला कित्येक कोटींची उलाढाल या महामार्गामुळेच होते; ...
कऱ्हाड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग हा पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्राची ‘लाईफ लाईन’. दिवसाला कित्येक कोटींची उलाढाल या महामार्गामुळेच होते; पण सध्या या उलाढालीला ‘ब्रेक’ लागलाय. कोरोनामुळे सर्वकाही ठप्प झालेय. वाहतूक रोडावल्यामुळे व्यवसाय डबघाईला आलेत. त्यातच ‘वीकेंड लॉकडाऊन’मुळे व्यावसायिकांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेय.
पुणे सोडल्यानंतर शिरवळपासून सातारा जिल्ह्याची हद्द सुरू होते. कऱ्हाड तालुक्यातील मालखेड हे महामार्गावरील जिल्ह्यातील अखेरचे गाव. यादरम्यान मोठ्या बाजारपेठेची अनेक गावे वसली आहेत. सातारा आणि कऱ्हाड ही त्यातील दोन महत्त्वाची शहरे. गत काही वर्षांत महामार्गानजीक खाद्य संस्कृती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गाच्या आसपास शेकडो हॉटेल, ढाबे व रेस्टॉरंट पाहायला मिळतात. त्याबरोबरच वाहन व वाहतुकीशी निगडित अनेक व्यवसायही थाटले गेले आहेत. मात्र, सध्या हे सर्वच व्यवसाय अडचणीत आहेत. गतवर्षीपासून या व्यवसायांना उतरती कळा लागली आहे.
गतवर्षी मार्च महिन्यात जिल्ह्यामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर काही महिने लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प होते. कालांतराने संक्रमणाचा वेग कमी झाल्यानंतर शिथिलता मिळाली. व्यवसाय पूर्ववत सुरू झाले. मात्र, फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना संक्रमणाने पुन्हा वेग घेतला संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्बंध लादले आहेत. रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. दिवसाही व्यावसायिकांना व्यवसाय करताना नियमांचे पालन बंधनकारक करण्यात आले आहे. त्याबरोबरच शुक्रवारी रात्रीपासून सोमवारी सकाळपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे इतर ठिकाणच्या व्यवसायांबरोबरच महामार्गानजीकचे व्यवसायही बंद पडले आहेत. एरव्ही वाहनांच्या रहदारीने गजबजलेल्या महामार्गावर सध्या शुकशुकाट असून, सर्व व्यवसाय ठप्प आहेत.
- चौकट
महत्त्वाच्या बाजारपेठा
१) शिरवळ
२) खंडाळा
३) भुईंज
४) पाचवड
५) आनेवाडी
६) सातारा
७) नागठाणे
८) अतीत
९) उंब्रज
१०) कऱ्हाड
११) मलकापूर
- चौकट
महामार्गाचे अंतर
१२८ कि.मी. : जिल्ह्यातील महामार्ग
६५ कि.मी. : शिरवळ ते सातारा
५० कि. मी. : सातारा ते कऱ्हाड
१३ कि. मी. : कऱ्हाड ते मालखेड
- चौकट
महामार्गाच्या आसपासचे व्यवसाय
१) हॉटेल, ढाबे, खाणावळ, पान शॉप, शीतपेय दुकाने, खाद्यपदार्थांचे हातगाडे
२) दुचाकी, तीनचारकी, चारचाकी वाहने, ट्रॅक्टर, अवजड वाहन विक्रेते व दुरुस्ती
३) टायर, स्पेअर पार्टस विक्री, गॅस किट विक्री व दुरुस्ती
४) व्हील अलायन्मेंट, टायर पंक्चर, बॅटरी विक्री व सेवा
५) नंबर प्लेट, कुशन वर्क्स, पेट्रोल, डिझेल व गॅस पंप, ऑईल विक्री
६) क्रेन, जेसीबी, ट्रान्सपोर्ट सेवा, ड्रायव्हिंग स्कूल, टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स
- चौकट
महामार्गामुळेच अनेकांचं पोट भरतं
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अनेक लहान-मोठे व्यवसाय उदयास आले आहेत. सध्या त्यातून बेरोजगारांच्या हातांना काम मिळाले आहे. महामार्गाच्या भरवशावरच संबंधित व्यवसाय तग धरून आहेत. महामार्गावर आनेवाडी व तासवडे असे दोन टोलनाके आहेत. या ठिकाणी भाजी, पाण्याच्या बाटल्या, चॉकलेट, बिस्कीट, स्ट्रॉबेरी असे साहित्य घेऊन विक्रेते वाहनांभोवती गर्दी करतात.
- चौकट
दररोज कोट्यावधीची उलाढाल
पुण्याहून येताना शिरवळजवळील सारोळा पुलापासून सुरू झालेली सातारा जिल्ह्याची हद्द कऱ्हाड तालुक्यातील मालखडे गावानजीक संपते. या पट्ट्यात महामार्गानजीक गत काही वर्षांत हजारो व्यावसायिकांनी आपले व्यवसाय आणि उद्योगपतींनी आपले उद्योग थाटले आहेत. महामार्गामुळे व्यवसाय, तसेच उद्योगांची दररोजची कोट्यवधीची उलाढाल होत असते.
फोटो : १०केआरडी०५
कॅप्शन : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शनिवारी रोडावल्याचे दिसून आले.