खंडाळा तालुक्यात ३१५ शिक्षकांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:40 IST2021-01-23T04:40:48+5:302021-01-23T04:40:48+5:30
खंडाळा : राज्य शासनाच्या आदेशानुसार खंडाळा तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी तयारी चालली आहेत. तालुक्यातील एकूण ८२ ...

खंडाळा तालुक्यात ३१५ शिक्षकांची कोरोना चाचणी
खंडाळा : राज्य शासनाच्या आदेशानुसार खंडाळा तालुक्यातील पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यासाठी तयारी चालली आहेत. तालुक्यातील एकूण ८२ उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू होणार आहेत. त्यासाठी इयत्ता पाचवी ते आठवी वर्गांना शिकविणाऱ्या ३१५ शिक्षकांची कोरोना चाचणी होणार आहे.
तालुक्यातील शैक्षणिक अध्यापन प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी नववी ते बारावीचे वर्ग अध्यापन सुरू झाले आहेत. आता पाचवी ते आठवीचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची एक बैठक पंचायत समितीत झाली. तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार ८२ शाळांमधील ३१५ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यामध्ये अहिरे केंद्रातील ४ शाळेचे १३ शिक्षक. खंडाळा केंद्रातील १४ शाळेचे ५४ शिक्षक, अहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात, खेड बुद्रुक केंद्रातील १० शाळेचे २६ शिक्षक, लोणंद केंद्रातील १३ शाळेचे ९० शिक्षक, अंदोरी केंद्रातील आठ शाळेचे २४ शिक्षक यांची लोणंद प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर लोणी केंद्रातील पाच शाळेचे १३ शिक्षक, शिरवळ केंद्रातील १३ शाळेचे ५० शिक्षक, नायगाव केंद्रातील ८ शाळा २२ शिक्षक, विंग केंद्रातील ७ शाळा २३ शिक्षक यांची शिरवळ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी होणार आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर शालेय परिसरात जंतुनाशक फवारणी करणे, वर्गांचे सॅनिटायझेशन करणे, विद्यार्थ्यांना मास्क उपलब्ध करणे, हात धुण्यासाठी साबण, नॅपकीन याची व्यवस्था करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.