कुडाळ येथे व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 12:09 PM2021-06-10T12:09:39+5:302021-06-10T12:10:44+5:30
CoronaVirus Satara : जावळी तालुक्यातील कुडाळ हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण आहे. परिसरातील नागरिक नेहमीच खरेदीसाठी याठिकाणी येतात. जिल्ह्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होऊन किराणा दुकानदार, भाजीपाला, बेकरी, हॉटेल, सलून या व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली.
कुडाळ : जावळी तालुक्यातील कुडाळ हे बाजारपेठेचे मुख्य ठिकाण आहे. परिसरातील नागरिक नेहमीच खरेदीसाठी याठिकाणी येतात. जिल्ह्यात अनलॉक प्रक्रियेला सुरुवात होऊन किराणा दुकानदार, भाजीपाला, बेकरी, हॉटेल, सलून या व्यावसायिकांना दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर कुडाळ ग्रामपंचायतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत येथील व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी केली.
कुडाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी अनंत वेलकर, आरोग्यसेवक सुभाष फरांदे, झाडे यांनी बाजारपेठेतील व्यापारी व कामगार अशा ८० जणांची कोरोना चाचणी केली. सुदैवाने यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. गावातील व्यापारी व कामगार यांच्या चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांनीच सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
अनलॉकनंतर बाजारपेठ पुन्हा सुरू होत असल्याने बाजारपेठेत लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याकरिता माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत व्यापारी आणि दुकानातील कामगारांची कोरोना चाचणी करणे आवश्यक होते. याकरिता ग्रामपंचायतीकडून व्यापाऱ्यांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या अनुषंगाने एकूण १०० जणांची कोरोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यात सुरुवातीला ८० लोकांची चाचणी करण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी अनंत वेलकर, आरोग्यसेवक सुभाष फरांदे, उपसरपंच सोमनाथ कदम, ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.