कऱ्हाड, पाटणमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:58+5:302021-01-17T04:33:58+5:30
कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ झाला. ...
कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी सकाळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ झाला. वैद्यकीय सेवकांना या वेळी लस देण्यात आली. जिल्ह्यात लसीकरणाचे योग्य नियोजन करून लवकरात लवकर सामान्यांपर्यंत ही लस पोहोचविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
पाटण ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत यादव यांनी स्वत: पहिले लसीकरण करून मोहिमेचा प्रारंभ केला. तालुक्यात पहिल्या टप्प्यात १ हजार ७०० व्यक्तींची लसीकरणासाठी ऑनलाइन निवड झाली आहे. त्यामध्ये डॉक्टर, नर्स, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा, पोलीस कर्मचारी यांना लसीकरण करण्यात येणार आहे. दिवसभरात १०० कोरोना योद्ध्यांना ही लस देण्यात आली. त्यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. नावनोंदणीप्रमाणे प्रत्येक दिवशी फक्त शंभर जणांनाच लस दिली जाणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत यादव यांनी दिली. या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.बी. पाटील, डॉ. बर्गे, डॉ. ओंकार पोतदार, डॉ. विशाल दंडवते, डॉ. संदीप पाटील, डॉ. कांचन पोतदार, डॉ. सरिता कांबळे, डॉ. करिष्मा बागवान, डॉ. प्रियांका राजे, मुसा चाफेरकर यांच्यासह आरोग्यसेविका, फार्मासिस्ट, अंगणवाडी सेविका, आशा, पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
फोटो: १६केआरडी०२
कॅप्शन : कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाला शनिवारी प्रारंभ करण्यात आला.