कोरोना लसीकरणाने जनतेला दिलासा : मकरंद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:37 AM2021-01-20T04:37:19+5:302021-01-20T04:37:19+5:30
खंडाळा : कोरोना विषाणूपासून सर्वसामान्य जनतेला दूर ठेवण्यासाठी आणि बाधित लोकांना सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाने रात्रंदिन मेहनत घेतली आहे. ...
खंडाळा : कोरोना विषाणूपासून सर्वसामान्य जनतेला दूर ठेवण्यासाठी आणि बाधित लोकांना सेवा पुरविण्यासाठी आरोग्य विभागाने रात्रंदिन मेहनत घेतली आहे. हे आरोग्य कर्मचारी खऱ्या अर्थाने कोरोना योध्दे आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या लसीकरणामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळेल, असा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.
खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, सभापती राजेंद्र तांबे, जिल्हा परिषद सदस्या दीपाली साळुंखे, उपसभापती वंदना धायगुडे, सदस्या शोभा जाधव, तहसीलदार दशरथ काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रवींद्र् कोरडे यांसह प्रमुख उपस्थित होते.
खंडाळा तालुक्यात ८९१ जणांना लसीकरण करण्यात येणार आहे . प्रतिदिन १०० लोकांना ही लस टोचली जाणार आहे. तालुक्यात पहिल्याच दिवशी ७५ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात आले असून, ही मोहीम सलग नऊ दिवस सुरू राहणार आहे. यासाठी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांचे विशेष प्रशिक्षण झाले आहे.