जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला तीन दिवसांपासून लागला ब्रेक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:04 AM2021-05-05T05:04:20+5:302021-05-05T05:04:20+5:30

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यांतील कोरोना लसीकरण सुरू झाले असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे ...

Corona vaccination in the district took a break for three days ... | जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला तीन दिवसांपासून लागला ब्रेक...

जिल्ह्यातील कोरोना लसीकरणाला तीन दिवसांपासून लागला ब्रेक...

Next

सातारा : जिल्ह्यात तिसऱ्या टप्प्यांतील कोरोना लसीकरण सुरू झाले असले, तरी अजूनही मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत नाही. त्यामुळे सर्वच गटांतील लसीकरणाची सुरुवात अडखळतच सुरू आहे. त्यातच लस उपलब्ध न झाल्याने सलग तीन दिवस लसीकरणाला ब्रेक बसला. परिणामी, अनेकांना हेलपाटा बसला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत सव्वापाच लाखांहून अधिक नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

जिल्ह्यात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस देण्यात आली. त्यानंतर, ६० वर्षांवरील ज्येष्ठ आणि ४५ ते ५९ वर्षांतील कोमॉर्बिड नागरिकांना कोरोना लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील सर्वांनाच लस मिळू लागली, त्यासाठी शासकीय आरोग्य केंद्रे आणि खासगी काही रुग्णालयात ही सुविधा सुरू झाली, तर शासकीय केंद्रात मोफत लस देण्यात येत आहे.

आता १ मेपासून कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना लस देण्याचा निर्णय झाला, पण हा निर्णय सद्यस्थितीत तरी यशस्वी होताना दिसून येत नाही. कारण कोरोना लसीचा साठाच उपलब्ध होत नाही. अगोदरच ४५ वर्षांवरील नागरिकांना लस मिळण्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच नवीन समस्या निर्माण होत आहे.

जिल्ह्यात सध्या ९ लाखांवर ४५ वर्षांवरील कोरोना लस लाभार्थी असून, १८ ते ४४ वयोगटांतील जवळपास ११ लाखांहून अधिक आहेत. जिल्ह्याला लस उपलब्ध होईल, त्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे. त्यासाठी जिल्ह्यात ४४० हून केंद्रांत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. या ठिकाणी रोटेशनप्रमाणे नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. त्यातच तीन दिवसांत जिल्ह्यात लसच आली नव्हती. त्यामुळे लसीकरण मोहीम थांबली. मंगळवारी कोरोना लस मिळणार होती. त्यासाठी वाहन पुण्याला लस आणण्यासाठी गेले. पुण्यात लस मिळाल्यास बुधवारी लसीकरण सुरू होईल, असे सांगण्यात आले.

पॉइंटर :

- जिल्ह्याला मिळालेले कोरोना डोस ६,२१,३५०

- आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविले ६,२१,२३०

- शिल्लक डोस १२०

- प्रथम डोस ५,२६,१२१

-दुसरा डोस ८०,२५१

..................

चौकट :

१८ ते ४४ वयोगट लसीकरण...

जिल्ह्यात १ मेपासून प्रायोगिक तत्त्वावर १८ ते ४४ वयोगटांतील नागरिकांना कोरोना लसीकरण सुरू आहे. त्यासाठी ५ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी आतापर्यंत २,३९९ जणांना लस देण्यात आली. या केंद्रातच काही प्रमाणात लसीकरण सुरू आहे.

......................................................

Web Title: Corona vaccination in the district took a break for three days ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.