कवठे आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण प्रगतिपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:42 AM2021-03-09T04:42:52+5:302021-03-09T04:42:52+5:30
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाकाळातील सहकार्य करणारे पोलीस व इतर विभागांच्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले ...
पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील कर्मचारी तर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाकाळातील सहकार्य करणारे पोलीस व इतर विभागांच्या नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. तिसरा टप्पा सुरू झाला असून यामध्ये ६० वर्षे वयाच्या पुढील व्यक्तींनी आरोग्य केंद्रात आधारकार्ड व मोबाइल नंबर आणल्यास त्यांची ऑनलाइन नोंदणीसुद्धा आरोग्य केंद्रातच केली जाईल. त्यांना तातडीने लस दिली जात आहे. यातीलच दुसरा टप्पा वय वर्ष ४५ ते ५९ वर्षे वयाचा असून आधारकार्ड, मोबाइल नंबर व रक्तदाब, दमा, मधुमेह, किडनी आदी आजार असल्याचे प्रमाणपत्र व त्यावर नोंदणीप्राप्त आरोग्य अधिकाऱ्याची सही असल्याचे प्रमाणपत्र सोबत आणावयाचे आहे.
हे प्रमाणपत्र अपलोड करण्यासाठी गरजेचे आहे. कवठे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार (दि. ६) पर्यंत ८७ लोकांचे लसीकरण केले असून अतिशय गतिमान पद्धतीने लसीकरण येथे होत आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार या तीन दिवशी आरोग्य केंद्रात लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये कवठे पंचक्रोशीतील लोकांमध्ये जनजागृती व्हावी व या भागातील सर्वच लोकांनी हे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन कवठे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्याधिकारी डॉ. विजय ठोंबरे यांनी दिली.
कवठे येथील ज्येष्ठ नागरिक भगतसिंग डेरे यांना लस देऊन कवठे येथील लसीकरणाचा शुभारंभ कवठे गावाचे सरपंच श्रीकांत वीर व माजी उपसरपंच संदीप डेरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
चौकट :
नावनोंदणी मोबाइलवर न करता आरोग्य केंद्रात करावी
वाई तालुक्यातून ३०५ लोकांनी लसीकरण केले असून यामध्ये मिशन हॉस्पिटल वाई येथून १७४, बावधन प्राथमिक आरोग्य केंद्रातून ३६, कवठे आरोग्य केंद्रातून ८७, तर गीतांजली हॉस्पिटल येथून ८ जणांनी लस घेतली आहे. सर्व्हर डाऊन होणे व काही लोकांना व्यवस्थित नोंदणी करता येत नसल्याने कवठे व बावधन येथील आरोग्य केंद्रामध्ये ऑनलाइन नोंदणीसुद्धा करण्यात आली असल्याने कागदपत्रे घेऊन नागरिकांनी आरोग्य केंद्रामध्ये येऊन लसीकरण करावे, असे आवाहन डॉ. विजय ठोंबरे व डॉ. गणेश पार्टे यांनी केले आहे.