कोरोना लसीकरण नोंदणी आता ग्रामपंचायतीतही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:39 AM2021-03-05T04:39:43+5:302021-03-05T04:39:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात ४५ ते ५९ वयातील कोमॉर्बिड व्यक्ती, तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठांना कोरोना लसीकरण सुरू ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात ४५ ते ५९ वयातील कोमॉर्बिड व्यक्ती, तसेच ६० वर्षांवरील ज्येष्ठांना कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या व्यक्तींच्या सोयीसाठी आता ग्रामपंचायतस्तरावर आपले सरकार सेवा केंद्रात नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे संबंधितांचा त्रास वाचणार आहे.
जिल्ह्यात १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ, तसेच ४५ ते ५९ वयातील कोमॉर्बिड व्यक्तींना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी शासकीय आणि खासगी रुग्णालयात सोय करण्यात आली आहे. शासकीयमध्ये मोफत, तर खासगी रुग्णालयात २५० रुपये शुल्क आकारण्यात येते. या लसीकरणासाठी लिंकवर नाव नोंदणी करावी लागते. त्यानंतर तारीख देऊन त्या दिवशी लसीकरण करून घ्यावे लागते, तर रुग्णालयात जाऊन नोंदणी करून लसीकरण करूनही घेता येते. मात्र, आता हा विलंब व गैरसोय टाळण्यासाठी ग्रामपंचायतस्तरावर नोंदणीची सुविधा निर्माण करून देण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात असणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्रातील चालकामार्फत नोंदणी करता येणार आहे. त्यासाठी पाच रुपये शुल्क आकारले जाणार आहे. ही नोंदणी करताना कागदपत्रांची आवश्यकता आहे. या सुविधेमुळे ग्रामीण भागातील ज्येष्ठांना आणि कोमॉर्बिड व्यक्तींना लाभ होणार आहे.
..........................................................