वाई तालुक्यात १८ हजार लोकांना कोरोना लसीचा डाेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:20+5:302021-04-16T04:40:20+5:30
वाई : कोरोनाचा कहर वाढला असून, अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन्स अपुरी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या ...
वाई : कोरोनाचा कहर वाढला असून, अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन्स अपुरी पडत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ होताना दिसत आहे. अशाच प्रकारे वाई शहर व तालुक्यातही बाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत तालुक्यातील साडेअठरा हजार लोकांचे कोरोना लसीकरण झाले आहे, तर एप्रिल महिन्यात १ हजार १६ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत ५ हजार ५९७ बाधित झाले असून, ४ हजार ६७५ मुक्त झाले आहेत, तर १६३ जणांचा मृत्यू झाला आहे.
वाई तालुक्यात कोराेनाची स्थिती अवघड होत चालली आहे. यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. कारण, तालुक्यात एप्रिलमध्येच आतापर्यंत १ हजार १६ रुग्ण सापडले असून, अलीकडच्या काही दिवसात तर १०० च्या घरात रुग्णवाढ होत आहे. त्याचबरोबर मार्च महिन्यात ४३८ रुग्ण सापडले होते. दरम्यान, राज्यासह देशात जानेवारी महिन्यात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरणाचा पहिला, दुसरा टप्पा होऊन आता तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण चालू आहे. वाई तालुक्यात आतापर्यंत साडेअठरा हजार जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. अजून लसीकरण मोहीम सुरूच आहे.
वाई ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून किसन वीर महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात विलगीकरण कक्ष, ऑक्सिजन बेडची वाढती गरज पाहता ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्यात येणार आहेत. व्हेंटिलेटरच्या ५ बेडची सोय केली जाणार आहे. तसेच मॅप्रो हॉस्पिटलमध्ये २० ऑक्सिजन बेड व २० साधे बेड तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार रणजित भोसले यांनी दिली.
कोट :
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, व्यावसायिक, नागरिकांनी सावधगिरी बाळगावी. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांमध्ये नागरिकांनी पळवाट काढू नये. नियमांचे कडक पालन केले पाहिजे. लसीकरण मोहीम चालू असून, प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- विद्यादेवी पोळ, मुख्याधिकारी, वाई नगरपालिका