corona virus : जिल्ह्यात आणखी २० जण कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 02:35 PM2020-06-22T14:35:26+5:302020-06-22T14:36:58+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी २० जण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता ८३८ वर पोहोचला आहे. तर बळींचा संख्या ३९ झाली आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढतच असून, सोमवारी आणखी २० जण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा आकडा आता ८३८ वर पोहोचला आहे. तर बळींचा संख्या ३९ झाली आहे.
जिल्ह्यात गत महिनाभरापासून कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढत चाललीय. सोमवारी सकाळी २० जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. जावळी तालुक्यातील गांजेमधील २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तसेच कऱ्हाड तालुक्यातील तारुखमधील २० वर्षीय २ वर्षीय बालक आणि २४ वर्षीय युवकाचाही कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील गोवारेमधील तीनजण पॉझिटिव्ह आढळून आले.
त्यामध्ये ४० वर्षीय महिला २४ वर्षीय युवक आणि ११ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तसेच पाटण तालुक्यातीलच हवालेवाडीमधील २८ वर्षीय युवक, पालेकरवाडी येथील ४२ वर्षीय पुरुष, कोयनानगरमधील २१ वर्षीय महिला आणि बागलवाडीतील ६० वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. फलटण येथील रविवार पेठमध्ये राहाणाऱ्या एका ३ वर्षीय बालकालाही कोरोनाची लागण झाली.
खटाव तालुक्यात पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामध्ये शिरसवाडीतील ५० वर्षीय महिला, ४० व ५६ वर्षीय पुरुष तसेच २ वर्षाचे बालक आणि म्हासूर्णेतील १८ वर्षीय युवतीचा समावेश आहे. सातारा तालुक्यातील क्षेत्र माहुली येथेही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. ४९ वर्षीय दोन महिला आणि १६ वर्षाच्या युवकाला कोरोनाची बाधा झाली आहे.
जिल्ह्यात आत्तापर्यंत ८३८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ६४३ कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत तर ३९ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या १५६ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.