corona virus : मायणी वैद्यकीय महाविद्यालयातून २७ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:26 PM2020-06-19T16:26:39+5:302020-06-19T16:30:27+5:30
मायणी येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना केअर सेंटर व कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल असलेल्या वृद्ध दाम्पत्यासह २७ जणांवर यशस्वी औषध उपचार करण्यात आले. ते सर्वजण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनावर यशस्वी मात केल्याबद्दल वृद्ध दाम्पत्यास टाळ्यांच्या गजरात व फुलांच्या वर्षावात निरोप देण्यात आला.
मायणी : येथील श्री छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना केअर सेंटर व कोरोना हेल्थ सेंटरमध्ये दाखल असलेल्या वृद्ध दाम्पत्यासह २७ जणांवर यशस्वी औषध उपचार करण्यात आले. ते सर्वजण कोरोनामुक्त झाले आहे. कोरोनावर यशस्वी मात केल्याबद्दल वृद्ध दाम्पत्यास टाळ्यांच्या गजरात व फुलांच्या वर्षावात निरोप देण्यात आला.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागला असल्याने आमदार जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मायणीतील वैद्यकीय महाविद्यालय ताब्यात घेतले.
या सेंटरमध्ये एकूण ३६ कोरोनाबाधित रुग्णांना दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातील २७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही आनंदाची बाब असून, यामध्ये डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे योगदान मोठे आहे.
डॉ. एम. आर. देशमुख म्हणाले, ह्यमायणीतील माळरानावर ३५ वर्षांपूर्वी उभे राहिलेले हे वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पिटल खटाव-माण तालुक्यासह जिल्ह्यातील एक आदर्श कोरोना सेंटर म्हणून नावारूपाला आले आहे. हे हॉस्पिटल खटाव-माणमधील कोरोनाग्रस्त रुग्णांना अधिक सोयीचे बनले आहे.
येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या पथकात खटाव-माण तालुक्यांतील डॉक्टर, स्त्री रोगतज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, शासकीय नर्सिंग व मेडिकल कॉलेजमधील कर्मचारी असे सुमारे शंभरहून अधिकजणांचे पथक रात्रंदिवस काम करीत आहे. या ठिकाणी स्वॅब घेण्याचीही सोय करण्यात आली आहे.
यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. देशमुख, नोडल अधिकारी डॉ. सचिन चव्हाण, संदीप देशमुख येथील सर्व डॉक्टर नर्सेस व हॉस्पिटलचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
ग्रामीण रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय सेवा...
ग्रामीण भागातील जनतेला अद्ययावत वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी आमच्या रुग्णालयात डायलिसिस, एमआरआय, सिटीस्कॅन, कॅथलॅब अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. रुग्णालयात शासनाच्या विविध आरोग्य योजनांतर्गत उपचार केले जाणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात बाधित रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात आहेत, अशी माहिती छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.