वाहून गेलेला बंधारा पंधरा दिवसांपासून पंचनाम्याच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2020 10:45 AM2020-10-05T10:45:40+5:302020-10-05T17:16:26+5:30
dam, satara, farmar मराठानगर (गुंडेवाडी) येथे येरळानदी पात्रामध्ये २०१२ मध्ये बांधलेल्या बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने या परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. दरम्यान, संबंधित विभागाने याचा पंचनामा केला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
मायणी : मराठानगर (गुंडेवाडी) येथे येरळानदी पात्रामध्ये २०१२ मध्ये बांधलेल्या बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवण्यात आली होती. पंधरा दिवसांपूर्वी हा बंधारा वाहून गेल्याने या परिसरातील शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भविष्यात गंभीर होणार आहे. दरम्यान, संबंधित विभागाने याचा पंचनामा केला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
शेतकऱ्यांकडून मिळालेली माहिती अशी की, मराठानगर (गुंडेवाडी) येथील शेतकऱ्यांची व ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी येरळा नदीवर २०१२ मध्ये बंधारा बांधण्यात आला होता.
पावसाळ्यात जास्त प्रमाणात पाणी साठ्यात नसल्याने हे पाणी उन्हाळ्यामध्ये बंधाऱ्यात राहत नसल्याने गावातील ग्रामस्थांनी संबंधित लोकप्रतिनिधींकडे आग्रह धरुन बंधाऱ्याची उंची २०१८ मध्ये वाढवून घेतली होती.
गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे येरळा नदीपात्रात असलेला बंधारा १६ सप्टेंबर रोजी वाहून गेला. नदीपात्रातून सध्या पाणी वाहत असूनही बंधारा नसल्याने पाणीसाठा होत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये व येणाऱ्या उन्हाळ्यात या परिसरातील शेतीपाणी प्रश्न व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे.
बंधारा वाहून गेल्यानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून या घटनेची माहिती दिली मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कोणीही संबंधित अधिकारी या बंधाऱ्याच्या पंचनामा करण्यासाठी फिरकला नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
शेकडो बागायती क्षेत्र अडचणीत
येरळा नदी पात्रात असलेल्या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेकडो एकर क्षेत्र बागायत झाले आहे. तसेच जमिनीतील पाणी पातळी वाढल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मार्गी लागला होता. मात्र हा बंधारा वाहून गेल्याने हे दोन्ही प्रश्न गंभीर झाले आहेत.