corona virus -कोरोनावर दैवी उपचार सांगणाऱ्या भोंदूगिरीपासून सावध राहा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 02:27 PM2020-03-23T14:27:58+5:302020-03-23T14:33:13+5:30
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन भोंदूगिरी करणारे बाबा कोरोनावर दैवी उपचार सांगतील, अशांपासून सावध राहा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी केले आहे.
सातारा : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करण्याचे शासन स्तरावरुन शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन भोंदूगिरी करणारे बाबा कोरोनावर दैवी उपचार सांगतील, अशांपासून सावध राहा, असे आवाहन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव प्रशांत पोतदार यांनी केले आहे.
कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी लवकर व स्वस्तात उपाय कुठून ,कसा मिळेल ,असं लोकांना वाटणं,यात लोकाची काही चूक नाही. मात्र,लोकांच्या धार्मिक श्रद्धांचा तसेच भावनांचा स्वत:च्या स्वार्थासाठी जाणीवपूर्वक उपयोग करून घेणारी काही मंडळी प्रत्येक समाजात कार्यरत असतात. सद्याच्या परिस्थीतीत या जीवघेण्या विषाणूबाबत समाजमनात एक अदृश्य, अनामिक भीती निर्माण होणे साहजिक आहे.
देव-धर्म, अध्यात्म यांच्या नावाखाली,कोरोना सारख्या जीवघेण्या विषाणूपासून सुटका करून घेण्यासाठी तंत्र-मंत्र ,जपजाप्य, धार्मिक प्रार्थना,पूजापाठ, होम-हवन, पठण अशा विविध अवैज्ञानिक,दैवी उपायांचे खात्रीशीर दावे, छातीठोकपणे करुन लोकांच्या गळी उतरविण्यात, ही ढोंगी मंडळी यशस्वी होताना दिसतात.
आपण सर्वजण या आवाहनाला उत्तम प्रतिसाद देत आहोत. तो तसाच पुढे देत राहू, वाढवत राहू या. अशा परिस्थीतीत ,लोकांच्या मनातील या भयग्रस्ततेचा गैरफायदा घेऊन, दैवी,अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धा पसरवण्यास पूरक ठरणारे उपाय ,उपचार करणारी काही भोंदूबुवा ,मांत्रिक ,गुरु ,भगत, पाद्री ,मौला- मौलवी अशी मंडळी पुढील काळात मोठ्या प्रमाणात समाजात उदयास येण्याची शक्यता आहे.
एक सजग नागरिक ,विवेकी कार्यकर्ता म्हणून आपण अशा ढोंगी,भोंदूबुवा यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून असायला हवे. शोषणाचे असे प्रकार लक्षात येताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक,किंवा तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस स्टेशन यांना शक्यतो सबळ पुराव्यानिशी आपण तत्काळ कळवायला हवे. त्याचप्रमाणे घरात थांबून आपण आपल्या मित्रांना नातेवाईकांनाही कोरोनाबाबत घ्यावयाच्या दक्षतेसह त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी धैर्य देणे आवश्यक आहे.
दैवी उपचार सांगणाऱ्या तशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्या समाजातील भोंदूगिरीविरोधात सतत प्रबोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. लोकांनीही स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी स्वत: घ्यावी. भोंदूगिरीपासून सावध राहावे,त्यांच्या मागे लागू नये. शासन,प्रशासन यांच्या आदेशांचे,सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,असे आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने करण्यात येत आहे.