corona virus : छातीत धाकधूक; काम बिनचूक !,झेडपीच्या २९० कर्मचाऱ्यांना बाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 01:06 PM2020-09-11T13:06:16+5:302020-09-11T13:08:45+5:30
नितीन काळेल सातारा : मिनीमंत्रालय समजणाऱ्या जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे एक-एक विभाग बंद ठेवावा लागतोय. ...
नितीन काळेल
सातारा : मिनीमंत्रालय समजणाऱ्या जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे एक-एक विभाग बंद ठेवावा लागतोय. त्यातच छातीत धाकधूक ठेवूनच कर्मचाऱ्यांना फाईलींचा निपटाराही करावा लागतोय. दुसरीकडे नागरिकांच्या गर्दीमुळे कोरोना जवळच बागडत असल्याचे वास्तवही समोर आलंय. अशामुळेच आतार्पंत झेडपीकडील २९० कर्मचाऱ्यांना कोरोना झालाय !
जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्हा परिषदेत मात्र, जुलै महिन्यात कोरोना शिरकाव झाला. एका पदाधिकाऱ्यांला आणि अन्य एका कर्मचाऱ्याला कोरोना झाला. त्यानंतर कोरोनाचा हा सिलसिला सतत सुरू राहिला.
गेल्या दीड महिन्यात तर सतत आज या विभागात तर त्यानंतर दुसऱ्या विभागात रुग्ण आढळत आहेत. तसेच जिल्ह्यात विविध ठिकाणी काम करणारे जिल्हा परिषदेचे कर्मचारीही बाधित होऊ लागले आहेत. त्यामुळे आतापर्यंत झेडपीकडील २९० कर्मचाऱ्यांना कोरोनाचा स्पर्श झालाय.
सातारा जिल्हा परिषद इमारतीत तर कोरोनाने चांगलाच शिरकाव केलाय. अनेक विभागांतील कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे संबंधित विभाग काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात येतोय. त्या कार्यालयाचे सॅनिटायझेशन करण्यात येते.
ऐवढेच नाही तर त्या विभागात संपर्कात असणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांचीच चाचणी करण्यात येते. अशाचप्रकारे बुधवारी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान विभागात एक-दोन नाही तर चौघेजण बाधित सापडले. त्यामुळे आख्खा विभागच बंद करण्यात आलाय. कार्यालयाला कुलुपच लावलंय.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील वस्तूस्थिती पाहिल्यावर अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या सावटातच काम करताना दिसत आहेत. आपल्या समोरील काम कसे होईल, हे सर्वांकडून पाहिले जात होते. पण, मनात कोठेतरी भीती दिसून येत होती. याबाबत काहींनी तर कोरोनाला बरोबर घेऊनच आम्ही कामे करतो, अशी स्पष्टता दिली.
याला कारण, म्हणजे आजही जिल्हा परिषदेत अनेक नागरिक कामे घेऊन येत आहेत. त्यामुळे बांधकामसारख्या विभागात गर्दी दिसून आली. सोशल डिस्टन्सिंगही या नागरिकांकडून पाळण्यात येत नाही. त्यामुळे नागरिक अवतीभवती वावरत असतानाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ये-जा तसेच कामे करावी लागत आहेत.
प्रशासनाने नागरिकांना अति महत्वाचे काम असेल तरच येण्याचे आवाहन केले आहे. पण, याकडे नागरिकांकडून दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याचे वास्तवही समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अधिकच वाढत आहे.
आतापर्यंत या विभागात रुग्ण आढळले...
अर्थ, बांधकाम, आरोग्य, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, रोजगार हमी योजना, समाजकल्याण विभाग. जिल्ह्यातील काही पंचायत समितीत.
वादाचे प्रसंग निर्माण...
जिल्हा परिषद इमारतीच्या मुख्य दरवाज्याजवळ टेबल ठेवण्यात आलेला आहे. तेथे नागरिकांची पत्रे, निवेदन घेण्याची व्यवस्था आहे. पण, नागरिक थेट विभागात जात आहेत. कर्मचाऱ्यांनी विचारणा केली तर नागरिकांकडून वादही घातला जातो. काहीजण तर थेट नेत्यांना कॉल करुन कार्यालयात सोडण्यासाठी गळ घालत असतात.
कोरोना काळात प्रशासन चिकाटीने काम करत आहे. नागरिकांनीच सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. अत्यंत महत्वाचे काम असेल तरच जिल्हा परिषदेत यावे. अर्ज, निवेदने मेलवर पाठवली तरी त्यांचे प्रश्न सुटू शकतात.
- मनोज जाधव,
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)
जिल्हा परिषदेत कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यासाठी ५० टक्के कर्मचाऱ्यांवर काम सुरू ठेवण्याबाबत संघटनांच्या वतीने अधिकाऱ्यांना भेटलो. प्रकृतीचा त्रास होत असेल अशा कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी.
- काका पाटील,
जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ