corona virus-पालचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 03:57 PM2020-03-17T15:57:10+5:302020-03-17T15:58:34+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र व कनार्टक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कऱ्हाड येथील खंडोबा मंदिर मंगळवारपासून बंद करण्यात आले.
उंब्रज : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्र व कनार्टक राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पाल, ता. कऱ्हाड येथील खंडोबा मंदिर मंगळवारपासून बंद करण्यात आले.
दरम्यान, देवाची दैनंदिन पूजा व इतर धार्मिक विधी पुजाऱ्यांकडून केली जाणार आहेत. पुढील निर्णय होईपर्यंत भाविकांनी व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांनी केले आहे.
पाल येथे मंगळवारी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील होते.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष रघुनाथराव खंडाईत, संचालक संजय काळभोर, सरपंच सयाजी काळभोर, उत्तमराव गोरे, अप्पासाहेब खंडाईत, बाबासाहेब काळभोर, संभाजी काळभोर, साहेबराव गोरे, अशोक काळभोर, बाबासाहेब शेळके, युवराज काळभोर आदी ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.
देवराज पाटील म्हणाले, खंडोबा मंदिर निर्जंतुकीकरण करण्याचे काम दररोज सुरू आहे. त्याचबरोबर सॅनिटायझर, हँडवॉश आदींचा वापर मंदिरात करण्यात येत होता. मात्र, कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी खंडोबा मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले असून, भाविक व ग्रामस्थांनी सहकार्य करावे.