corona virus in satara-कोरोनाच्या धास्तीेने सिव्हिलमधील रुग्ण गेले घरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 04:05 PM2020-03-25T16:05:02+5:302020-03-25T16:10:37+5:30
कोरोनाच्या धास्तीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण डिस्चार्ज घेऊन घरी गेले आहेत. पूर्वी वॉर्डमध्ये रुग्णांना कॉट उपलब्ध नसायच्या पण आता बहुतांश वॉर्ड मोकळे पडले आहेत. काही वॉर्डामध्ये एकही रुग्ण नाही.
सातारा : कोरोनाच्या धास्तीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेणारे रुग्ण डिस्चार्ज घेऊन घरी गेले आहेत. पूर्वी वॉर्डमध्ये रुग्णांना कॉट उपलब्ध नसायच्या पण आता बहुतांश वॉर्ड मोकळे पडले आहेत. काही वॉर्डामध्ये एकही रुग्ण नाही.
साताऱ्यात कोरोनाचे दोन बाधित रुग्ण सापडल्यानंतर सिव्हिलमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. सिव्हिलमध्ये ज्या ठिकाणी कोरोनाचे बाधित आणि संशयित ठेवले आहेत. त्या परिसरातील वॉर्ड अक्षरक्ष: रिकामे झाले आहेत. वॉर्डमधील रुग्णांनी स्वत:हून डिर्स्चाज घेतला आहे.
इथं संसर्ग होण्यापेक्षा घरी राहून आम्ही उपचार घेतो, असे सांगून अनेकांनी घरी राहणे पसंत केले आहे. इतर दिवशी सिव्हिलमध्ये रोज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या एक हजारांहून अधिक असायची. मात्र, आता दिवसाला केवळ ६० रुग्ण येत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
नेहमी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही अत्यंत कमी झाली आहे. कोरोनाची दहशत नागरिकांच्या मनामध्ये असल्यामुळे सिव्हिलमध्ये उपचार घेण्यासही कोणी येत नाही. ज्या लोकांना नाईलाज आहे, असे लोक या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत आहेत.
या रुग्णांपासून तर आम्हाला कोरोनाचा संसर्ग होणार नाही ना, अशी चिंता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही लागून राहिली आहे.
शहरातील खासगी दवाखानेही अद्याप बंद आहेत. असे असताना सिव्हिलमध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाल्याने खासगी दवाखान्यातील लोक नेमके कुठे उपचार घेत आहेत, असा प्रश्न सिव्हिलमधील कर्मचाऱ्यांना पडला आहे.
गत आठवड्यात जोपर्यंत कोरोनाचा बाधित रुग्ण सापडत नव्हता. तोपर्यंत सिव्हिलमध्ये रुग्णांची ये-जा सुरू होती. परंतु आता ही परिस्थिती राहिली नाही.
सिव्हिलला वळसा...
सिव्हिल परिसरात जाण्यासाठी अनेकजण धजावत नाहीत. सिव्हिलला वळसा घालून अनेकजण जात आहेत. मात्र, सिव्हिलच्या रस्त्याने कोणी जात नाही. जेणेकरून आपल्याला संसर्ग होऊ नये म्हणून याची खबरदारी त्यांनी घेतली आहे.