corona virus : गुलबहार हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 07:11 PM2020-08-03T19:11:59+5:302020-08-03T19:11:59+5:30
सातारा येथील पोवई नाक्यावरील गुलबहार हॉटेलवरील कारवाईचा अखेर पदार्फाश झाला. सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी टाकलेल्या छाप्यात हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला. कोरोना काळात हे हॉटेल शासनाने अधिग्रहित केले असतानाही येथे खासगी लोकांना जेवण देणे, लॉजिंगसाठी रुम देण्याचे प्रकार होत असल्याचे उघड झाले.
सातारा : येथील पोवई नाक्यावरील गुलबहार हॉटेलवरील कारवाईचा अखेर पदार्फाश झाला. सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी टाकलेल्या छाप्यात हॉटेल मालकांसह चौघांवर गुन्हा दाखल झाला. कोरोना काळात हे हॉटेल शासनाने अधिग्रहित केले असतानाही येथे खासगी लोकांना जेवण देणे, लॉजिंगसाठी रुम देण्याचे प्रकार होत असल्याचे उघड झाले.
हॉटेल मालक हरदीपसिंग गुरमितसिंग रामगडीया (रा. रविवार पेठ, सातारा), हॉटेल मालक कमलेश मधुकर पिसाळ (रा. केसरकर पेठ, सातारा), किशोर संजय मोहिते (वय २७, रा. कोडोली, ता. सातारा), धनंजय महादेव देसाई (वय ४२, रा. गोडोली, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोवई नाक्यावरील गुलबहार हॉटेलमध्ये पार्टी चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या पथकाने या हॉटेलवर छापा टाकला होता. या छाप्यामध्ये सुमारे चार ते पाच तास हॉटेलची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल होणे आवश्यक होते. मात्र, दोन दिवस उलटले तरीही गुन्हा दाखल झाला नाही.
सीसीटीव्ही फुटेजवर माहिती संकलित करण्यासाठीमुळे गुन्हा दाखल होण्यास वेळ लागल्याचे वरिष्ठांनी सांगितले. समीर शेख यांनी या प्रकरणाचा तपास करुन त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे सादर केला. त्यानुसार वरील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
सीसीटीव्हीतून पर्दाफाश
शासनाने गुलबहार हॉटेलचे अधिग्रहण केले आहे. असे असतानाही हॉटेलमध्ये तब्बल तीस लोकांनी जेवण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरुन दिसत आहे. हॉटेलच्या संगणकावरुन १९ बिले देण्यात आली असून, ती बिले जप्त करण्यात आली आहे. तसेच खासगी लोकांना राहण्यासाठी लॉजिंग दिल्याचे उघड झाल आहे.
अधिकाऱ्याला का वाचवतायत?
गुलबहार हॉटेलची कारवाई करताना सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता त्यामध्ये एक शासकीय अधिकारी मित्रांसमवेत दारु पित जेवण करताना आढळून आला आहे. मनाई असताना हॉटेल सुरु ठेवले, त्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करत तेथे जेवण, दारु पिल्याचे दिसत आहे. पोलिसांच्या अहवालात संबंधित अधिकाऱ्याचे नाव असून, त्याच्यावरही गुन्हा का दाखल केला जात नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.