corona virus : फलटणमधील एका कोरोना बाधित व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 01:38 PM2020-06-23T13:38:31+5:302020-06-23T15:14:38+5:30
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणारा फलटण येथील सारी आणि कोरोना बाधित ६२ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल गडीकर यांनी दिली आहे.
सातारा : येथील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल फलटणमधील सारी व कोरोना बाधीत ६२ वर्षांच्या वृध्दाचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात कोरानाने बळी पडलेल्यांचा आकडा आता ३९ झाला आहे. तर १०१ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून कोरोना विषाणूचे संकट आहे. टप्प्याटप्प्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तसेच मृतांचा आकडाही वाढू लागला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ८४४ रुग्ण आढळून आले असून ६६८ जण बरे झाले आहेत. सध्या बाधित १३७ जणांवर उपचार सुरू असून मंगळवारी सकाळी आणखी एकाचा मृत्यू झाला. फलटणमधील वृध्द सारी आणि कोरोना बाधित होता. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
सोमवारी रात्री उशीरा पुणे व कऱ्हाडच्या कृष्णा मेडिकलमधून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील १०१ नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
एकाच्या मृत्यूची बाधित नोंद नाही...
कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये १९ जून रोजी एकाचा मृत्यू झाला होता. संबंधिताचा मृत्यू पश्चात अहवाल बाधित आला आहे. मात्र, शासन नियमाप्रमाणे मृत्यू पश्चात चाचणी करायची नाही. त्यामुळे संबंधित मृत व्यक्ती बाधितांमधून कमी करण्यात आली आहे. परिणामी आता कोरोनाने मृत झालेल्यांची संख्या ३९ झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.