corona virus : साताऱ्यात डबलसीट दुचाकीस्वारांना पोलिसांकडून ई-चलनाचा डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 05:59 PM2020-07-04T17:59:08+5:302020-07-04T18:00:29+5:30
एरवी दुचाकीस्वार समोरून आल्यानंतर पोलीस त्याला हात दाखवून कागदपत्रे तपासत होते. मात्र, शुक्रवारी सातारकरांना यालट अनुभव आला. डबलसीट दुचाकीस्वार निदर्शनास येताच गुडघ्यावर खाली बसून पोलीस गाडीचा फोटो घेत होते.
सातारा : एरवी दुचाकीस्वार समोरून आल्यानंतर पोलीस त्याला हात दाखवून कागदपत्रे तपासत होते. मात्र, शुक्रवारी सातारकरांना यालट अनुभव आला. डबलसीट दुचाकीस्वार निदर्शनास येताच गुडघ्यावर खाली बसून पोलीस गाडीचा फोटो घेत होते.
संबंधित दुचाकीस्वाराला काहीही न बोलता त्याला सोडून दिले जात होते. मात्र, काही वेळातच संबंधित दुचाकीस्वाराला ई-चलनाचा दंड आकारल्याचा एसएमएस आल्यानंतर दुचाकीस्वाराला डोक्यावर हात मारून घेण्याची वेळ येत होती. दिवसभरात १ हजार ५४४ दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली असून, यातून ५ लाख ३८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहाता पोलिसांनी दुचाकीस्वारांना डबलसीट न बसण्याचे अनेकदा आवाहन केले होते. मात्र, तरीही अनेक दुचाकीस्वार या सूचनांकडे दुर्लक्ष करून डबलसीट बसत होते. पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी शुक्रवारी दुपारी बारा वाजता पोवई नाक्यावर अचानक कारवाईला सुरुवात केली.
डबलसीट येणाºया दुचाकीस्वारांचा मोबाईलवर पोलीस फोटो घेऊ लागले. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना नेमका काय प्रकार आहे, हे समजून येत नव्हते. प्रत्येक पोलिसाच्या हातात मोबाईल होता. डबलसीट दुचाकीस्वार निदर्शनास येताच त्याला थांबवून त्याचा फोटो काढत होते. काहीजण न थांबताच जात होते.
अशा दुचाकीस्वारांचाही पोलिसांनी आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढला. रात्री उशिरापर्यंत १ हजार ५४४ दुचाकीस्वारांवर पोलिसांनी कारवाई केली. हा ई-चलनाचा दंड कोणाला दोनशे तर कोणाला पाचशे अशा स्वरूपात आकारण्यात आला आहे