CoronaVirus Lockdown : कारागृहातील आणखी एकाला कोरोना, जिल्ह्यात बाधितांची संख्या १२५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:32 PM2020-05-15T17:32:22+5:302020-05-15T17:34:31+5:30
सातारा जिल्ह्यात एक दिवसाआड कोरोनाचा रुग्ण आढळून येत असून, जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी आणखी एका बंदिवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कारागृहात दहाजण बाधित असून, संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आता १२५ वर पोहोचला आहे. दरम्यान, ११५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आठ संशयितांना नव्याने दाखल करण्यात आले आहे.
सातारा : जिल्ह्यात एक दिवसाआड कोरोनाचा रुग्ण आढळून येत असून, जिल्हा मध्यवर्ती कारागृहात शुक्रवारी आणखी एका बंदिवानाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कारागृहात दहाजण बाधित असून, संपूर्ण जिल्ह्याचा आकडा आता १२५ वर पोहोचला आहे. दरम्यान, ११५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आठ संशयितांना नव्याने दाखल करण्यात आले आहे.
पुण्यावरून आलेल्या दोन बंदिवानांना सुरुवातीला कोरोनाची बाधा झाल्यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये कोरोनाची साखळी वाढू लागली आहे. त्यामुळे प्रशासन चिंतेत पडले आहे. शुक्रवारी कारागृहातील आणखी एका २६ वर्षीय बंदिवानाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनामध्ये खळबळ उडाली.
एकट्या कारागृहातील कोरोना बाधितांचा आकडा आता १० वर पोहोचला आहे. सातारा शहरामध्ये संशयित म्हणून नव्याने दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. कारागृहातील बंदिवानांशिवाय यापूर्वी सातारा शहरात चार कोरोना बाधित सापडले आहेत.
या रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. एकट्या सातारा शहरातील कोरोना बाधितांचा आकडा १४ वर पोहोचला आहे. हा आकडा वाढू नये म्हणून प्रशासनाकडून आणखी खबरदारी घेण्यात येत आहे. बाधितांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तत्काळ क्वॉरंटाईन करण्यात येत आहे. तसेच संबंधित परिसरही सील करण्यात येत आहे.
दरम्यान, कऱ्हाड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील ९९, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील २, व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील १४ अशा एकूण ११५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्हा शासकीय रुग्णालयात आठजणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या १२५ झाली असून, यापैकी कोरोनामुक्त होऊन ४५ जण घरी गेले आहेत. तर दोन कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७८ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.