CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये साताऱ्यात अन् रहिमतपूरला दारूविक्रीवर धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2020 04:20 PM2020-04-22T16:20:32+5:302020-04-22T16:22:43+5:30
लॉकडाउन असतानाही लपून-छपून दारू विक्री करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि सातारा शहरामध्ये पोलिसांनी कारवाई करून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३० हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.
सातारा : लॉकडाउन असतानाही लपून-छपून दारू विक्री करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि सातारा शहरामध्ये पोलिसांनी कारवाई करून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३० हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे.
देवराज मोहन कोकीळ (वय २९, गणेशनगर, विलासपूर, सातारा), प्रसाद विकास महामुने (वय २२, रा. कारंजकर नगर, विलासपूर, सातारा), विशाल सुधीर कारंजकर (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव), तोहफिक नजीर नदाफ (वय २३, रा. रहिमपूर, ता. कोरेगाव), बार मालक सचिन सूर्यकांत बेलागडे (वय ४८, रा. रोकडेश्वर गल्ली, रहिमतपूर) अशी अटक झालेल्यांची नावे आहेत. यामधील विशाल कारंजकर हा दोन्ही घटनांमध्ये समावेश होता.
याबाबत अधिक माहिती अशी, साताºयातील उपनगर असलेल्या करंजकर विलासपूरमधील एका बोळामध्ये दि. २० रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता तीनजण दारू विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला.
या ठिकाणी पोलिसांना देवराज कोकीळ, प्रसाद महामुने आणि विशाल कारंजकर हे तिघे सापडले. त्यांच्याकडून विविध प्रकारचा दारूसाठा सुमारे ८६ हजार ३०० रुपये किमतीचा जप्त करण्यात आला. या तिघांकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांनी हा दारूसाठा रहिमतपूर येथून आणल्याची कबुली दिली.
या महितीच्या आधारे पोलिसांनी त्याच रात्री आठच सुमारास रहिमतपूर येथे सापळा लावला. टकले बोरगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन व्यक्ती दारूची वाहतूक करत असताना पोलिसांना सापडले. त्यांच्या ताब्यातून ४३ हजार ८३६ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
या व्यक्तींनी बार मालक सचिन बेलागडे याच्याकडून दारूसाठा विकत घेतला असल्याचे सांगितल्यानंतर पोलिसांना बार मालकालाही अटक केली.
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार तानाजी माने, प्रवीण शिंदे, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, संजय जाधव, विजय सावंत, गणेश कचरे यांनी ही कारवाई केली.