corona virus : सातारा नगरपालिकेचा जन्म-मृत्यू विभागच क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 12:30 PM2020-09-11T12:30:27+5:302020-09-11T12:33:16+5:30
सातारा पालिकेच्या कोरोना व पाणीपुरवठा विभागापाठोपाठ आता जन्म-मृत्यू विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक महिला कर्मचारी कोरोना बाधित असून, तीच्या संपर्कातील अन्य पाच कर्मचारी सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे सलग दोन आठवडे या विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.
सातारा : सातारा पालिकेच्या कोरोना व पाणीपुरवठा विभागापाठोपाठ आता जन्म-मृत्यू विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एक महिला कर्मचारी कोरोना बाधित असून, तीच्या संपर्कातील अन्य पाच कर्मचारी सध्या क्वारंटाईन आहेत. त्यामुळे सलग दोन आठवडे या विभागाचे कामकाज बंद ठेवण्यात आले आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी पालिकेचे अधिकारी व कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून अहोरात्र झटत आहेत. स्वच्छता, औषधफवारणी, धूर फवारणी, घर टू घर सर्व्हे, प्रतिबंधित क्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या उपाययोजना, कोरोनामुळे दगावणाऱ्या रुग्णांवर अंत्यसंस्कार अशी अनेक कामे हे कर्मचारी जबाबदारीने पार पाडत आहे. हे करत असतानाच काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागनही होत आहे.
काही दिवसांपूर्वीच कोरोना व पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागन झाली होती. त्यापाठोपाठ आता जन्म-मृत्यू विभागातही कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे.
या विभागातील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, तीच्या संपर्कातील अन्य पाच कर्मचारी क्वारंटाईन आहेत. संपूर्ण विभागच क्वारंटाईन झाल्याने या विभागाचे कामकाज दोन आठवडे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, कोरोनामुळे सलग पाच दिवस बंद असलेल्या पाणीपुरवठा विभागाचे कामकाजही गुरुवारी अंशत: सुरू झाले.
नागरिकांची परवड
शहरातील रुग्णालये, प्रसुतीगृहात जन्माला आलेल्या शिशूंची नोंद करून ती पालिकेकडे दिली जाते. तसचे स्मशानभूमीत मृत्यू झालेल्यांनी नोंदही पालिका करते. संगणक प्रणालीद्वारे नागरिकांना जन्म-मृत्यूचे दररोज शंभर तर महिन्याला सुमारे अडीच हजार दाखले दिले जातात.
हा विभाग पूर्णत: बंद असून, तसा सूचना फलक विभागाबाहेर लावण्यात आला आहे. दरम्यान, याबाबतची कोणतीही माहिती नसल्याने गुरूवारी दाखल्यांसाठी पालिकेत आलेल्या नागरिकांना सूचना फलक वाचून माघारी जावे लागले.