corona virus : कोरोनाग्रस्त साताऱ्याला राज्य शासनाने वाचवावे : लोकप्रतिनिधींचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 12:49 PM2020-09-07T12:49:03+5:302020-09-07T12:51:53+5:30
कोरोना महामारीचे संकट काळ बनूल आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या साडेसतरा हजारांच्यावर गेली असून रोज १५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही तर बेडही उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती असून राज्य शासनाने जिल्ह्याला कोरोना महामारीपासून वाचवावे, यासाठी जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात आग्रह धरणार आहेत.
सागर गुजर
सातारा : कोरोना महामारीचे संकट काळ बनूल आले आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या साडेसतरा हजारांच्यावर गेली असून रोज १५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. आॅक्सिजन, व्हेंटिलेटर मिळत नाही तर बेडही उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती असून राज्य शासनाने जिल्ह्याला कोरोना महामारीपासून वाचवावे, यासाठी जिल्ह्यातील बहुतांश लोकप्रतिनिधी पावसाळी अधिवेशनात आग्रह धरणार आहेत.
जिल्ह्यामध्ये अनलॉकच्या आधी दिवसाकाठी सरासरी १00 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. राज्यात अनलॉक झाल्यानंतर मात्र या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे ४६२ लोकांना जीव गमवावा लागला आहे. तर एका दिवसात ९00 च्यावर कोरोनाबाधित रुग्ण आता आढळू लागले आहेत. ही परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.
कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी जी रुग्णालये शासनाने ताब्यात घेतली आहेत, त्या रुग्णालयांमध्ये बेडची संख्या कमी पडत आहे तर आॅक्सिजन, व्हेंटिलेटर आणि रेडमिसीवीर इंजेक्शन अपुरे पडत असल्याने अत्यवस्थ रुग्ण दगावत आहेत. आरोग्य यंत्रणाही आता थकल्याचे चित्र आहे.
सोमवार व मंगळवारी (दि. ७, दि. ८) पावसाळी अधिवेशनाचे कामकाज मुंबईत होणार आहे. या अधिवेशनातील प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर प्रश्नांवर चर्चा होणार नाही. मात्र जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने आमदार उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालण्याच्या तयारीत आहेत. साताऱ्यात कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे, त्यासाठी निधी उपलब्ध करत असताना तांत्रिक बाबींमध्ये न अडकता शासनाने निधी उपलब्ध करण्याची मागणी आ. जयकुमार गोरे हे अधिवेशनावेळी करणार आहेत.
कास परिसरातील खासगी जागेत झालेली बांधकामे नियमित करावीत तसेच उरमोडीच्या सातारा तालुक्यातील कालव्यांसाठी ५0 कोटींची मागणी केली असून त्यासाठी पाठपुरावा करत असल्याची माहिती आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. तसेच जिहे-कठापूर योजनेचे पाणी उत्तर कोरेगाव, पूर्व कोरेगाव तसेच खटाव तालुक्यातील नेर धरणाच्या वरच्या भागात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आ. महेश शिंदे यांनी सांगितले.
साताऱ्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर सुरु करणे अत्यावश्यक आहे. हे महाविद्यालय व हॉस्पिटल तयार असते तर आत्तासारखी धावाधाव करावी लागली नसती. कोविड महामारीतून बोध घेऊन मेडिकल कॉलेज उभारण्यासाठी आग्रह धरणार आहे.
- आमदार जयकुमार गोरे
आरोग्य विभागामध्ये तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. अनेक वर्षे भरतीच झाली नसल्याने महामारीचा कहर रोखणे कठीण होऊन बसले आहे. डॉक्टरांसह तज्ञ वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आग्रह धरणार आहे.
- आमदार महेश शिंदे
कोरोनाच्या महामारीमुळे पावसाळी अधिवेशन हे अवघ्या दोन दिवसांचे असणार आहे. प्रश्नोत्तराचा तासही होणार नाही. मात्र तरी देखील या अधिवेशनात जिल्ह्यातील समस्यांविषयी प्रश्न उपस्थित करणार आहे. सातारा तालुक्यातील उरमोडी धरणाच्या कालव्यांच्या कामांसाठी आग्रह धरणार आहे.
- आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले