corona virus : फलटण तालुक्यात दहा शिक्षक, कर्मचारी बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2020 02:06 PM2020-11-23T14:06:18+5:302020-11-23T14:07:30+5:30
coronavirus, school, teacher, educationsector, sataranews कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांपैकी माध्यमिक विभागातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित शिक्षण संस्था, पालक, शिक्षक यांच्याशी संपर्क करून, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियम निकषानुसार सर्व व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी दिली आहे.
फलटण : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांपैकी माध्यमिक विभागातील इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने संबंधित शिक्षण संस्था, पालक, शिक्षक यांच्याशी संपर्क करून, शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियम निकषानुसार सर्व व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी दिली आहे.
फलटण तालुक्यात एकूण ८० माध्यमिक विद्यालये असून, त्यामध्ये नववी ते बारावी या वर्गात १७ हजार ३२४ विद्यार्थी शिक्षण घेत असून १ हजार ८४ शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार या सर्व माध्यमिक शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पूर्ण करण्यात आली आहे.
त्यापैकी सुमारे दहा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्ऱ्यांची चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे नमूद करीत सर्व ८० विद्यालयांतील शाळा खोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याच्या दिवसापासून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑक्सिमीटर व थर्मल गनद्वारे तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी सांगितले.
सर्व ८० माध्यमिक विद्यालयांमधील शाळा व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेण्यात आल्या असून, बहुसंख्य ठिकाणी या समित्यांचे सदस्य कमी अधिक प्रमाणात उपस्थित राहिले असून, त्यांनी शाळा सुरू करण्यास संमती दर्शविली आहे. पालकांची संमतीपत्रके ५० टक्केपर्यंत उपलब्ध झाली असून, प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित पालकांची संमतीपत्रे उपलब्ध होतील अशी अपेक्षा असून, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांनी शाळा सुरु करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे आर.व्ही.गंबरे यांनी सांगितले.
इयत्ता ९ वी ते १२ वी या वर्गांसाठी प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार असून, उर्वरित प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण व्यवस्था कार्यान्वित राहणार असल्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.