corona virus-रोजंदारी कामगारांची व्यथा,अनेकांनी वळविला मुळ गावाकडे मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:29 AM2020-03-21T11:29:30+5:302020-03-21T11:35:49+5:30
सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत.
प्रगती जाधव-पाटील
सातारा : कोरोनाबाबत साताऱ्यात अद्याप जरी सकारात्मक चित्र असलं तरी पुढील आठ दिवस अजूनही कसोटीचे आहेत. या परिस्थितीत नोकरवर्गाला ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय उपलब्ध आहे. पण ज्यांच्याकडे सकाळी काम केल्यावर रात्री अन्न शिजते त्या रोजंदार कामगारांची स्थिती दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. ‘आम्ही कोरोनाने नाही उपासमारीने मरू’ असे हतबल उद्गार त्यांच्या तोंडून येत आहेत.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक ठिकाणी जमावबंदी आदेश लागु केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच धार्मिक उत्सवही बंद केल्याने अनेकांच्या हाताचे काम गेले आहे. परिणामी कोणी काम देता काम असं म्हणत त्यांना दारोदारी फिरायची वेळ आली आहे.
सातारा येथे राजवाडा परिसरात वेठबिगारी कामे करणारे कामगार रोज सकाळी आठच्या सुमारास हजेरी लावतात. कंत्राटदार येथून रोजाची बोलणी करून त्यांना कामाच्या ठिकाणी घेवून जातात. रोजच्या रोज काम करून हातात मिळणाऱ्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह होतो. पण कोरोनाच्या संकटामुळे या सर्वांच्या रोजगाराचे वांदे झाले आहेत.
ग्रामीण भागातून रोजासाठी येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे, मात्र, त्यांनी शेतात काम करून अर्थाजनाचा मार्ग शोधला आहे. पण शहरी भागात राहणाऱ्या कामगारांना शेतीच्या कामाचा पर्याय नसल्याने ते समोर येईल ते काम करण्यासाठी रोजंदारीच्या शोधात फिरत आहेत.
काही वेठबिगाऱ्यांनी हॉटेलात तर कोणी स्वच्छतेचे काम स्विकारून आपला एकएक दिवसाचा रोजगार मिळविला. भविष्यात मात्र, हे स्थिती अधिक गंभीर होईल, हे निश्चित!
जीवनावश्यक वस्तुंसाठी आप्तकालीन कक्षाची गरज
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारकरांना गर्दी करण्याचे टाळा असे आवाहन केले आहे. परिणामी अनेक सातारकरांनी घरात राहणंच पसंत केलं आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय आणि व्यापार परिणाम झाला आहे.
नोकरदार सुट्टी काढून तर व्यावसायिकांचा व्यवसाय सुरू ठेवून उदरनिर्वाह सुरू आहे. या पार्श्वभूमीवर हातावर पोट असणाऱ्या अनेकांचे वांदे झाले आहेत. शासन स्तरावर अशा लोकांची माहिती संकलित करून त्यांनाही जिवनावश्यक वस्तु उपलब्ध करून देण्यासाठी आप्तकालीन कक्षाची उभारणी करणं आवश्यक बनलं आहे.
राजवाडा चौपाटीचाही अनेकांना फटका
राजवाडा चौपाटी हे खाद्याचं ठिकाण अनेकांच्या आवडीचं आहे. कित्येकांची क्षुधाशांती करणारे हे ठिकाण तब्बल अडीचशेहून अधिक कुटूंबांना आधार देतं. यातील बहुतांश लोक रोजच्या रोज मिळणाऱ्या उत्पन्नावरच घर चालवतात. प्रशासनाने आवाहन केल्यानंतर ३१ मार्चपर्यंत चौपाटी बंद ठेवण्यात आली आहे. याचाही मोठा फटका येथील व्यापाऱ्यांना बसत आहे. यातील बाहेरगावचे व्यापारी इथं राहून खर्च करण्यापेक्षा आपापल्या गावी परतले आहेत.
चौपाटी बंद झाल्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांचे सर्वाधिक हाल झाले. काही कारणांनी पूर्वी चौपाटी बंद असली तरीही घरगुती कार्यक्रमांच्या आॅर्डर मिळवून विक्रेते त्यांच्या झालेला खडा भरून काढायचे. आता मात्र सर्वावरच बंधने आल्याने इथं राहून खर्च वाढविण्यापेक्षा मिळेल त्या वाहनाने कामगार गावी गेले आहेत.
- देवेंद्र शर्मा,
चौपाटी व्यावसायिक, सातारा